मुंबई,दि.२१: Maharashtra Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सत्ताधारी पक्षामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावलं आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर एका आठवड्याच्या आत सुनावणी सुरू करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सत्ताधारी पक्षामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्षही दिल्लीला रवाना झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग | Maharashtra Crisis
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरले तर भाजपाकडून काय राजकीय पावलं उचलली जातील? याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीने ‘प्लॅन बी’ तयार केल्याचंही बोललं जात आहे. एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर अजित पवारांना मुख्यमंत्री पदासाठी प्राधान्य दिलं आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे-पाटील आणि नितीन गडकरी यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाच्या ‘प्लॅन बी’बाबत विचारलं असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “याबद्दल मला कुठलीही माहिती नाही. याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. राज्यात पुन्हा एकदा चर्चा घडवून आणण्यासाठी कुणीतरी हा फुसका बॉम्ब सोडला आहे.”
राहुल नार्वेकर यांच्या दिल्ली दौऱ्यावर भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने काही सूचना दिल्या असतील, काही टिप्पणी केली असेल किंवा नार्वेकरांनी काय पुढाकार घ्यावा, यासाठी कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. कायद्याची बाजू तपासून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी ते दिल्लीला गेले असावेत. पण मला एवढा विश्वास आहे की, राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. ते कायदेपंडित आणि कायदेतज्ज्ञ आहेत. ते जो काही निकाल देतील, तो निकाल कायद्याच्या चौकटीत देतील. ते एककल्ली निर्णय घेणार नाहीत.”