वटवृक्ष मंदिरात परंपरेप्रमाणे होणार दत्त जन्मोत्सव

दत्त जयंती निमीत्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन महेश इंगळे यांची माहिती

0

अक्कलकोट,दि.६: श्री स्वामी समर्थांचे आद्य अवतार असलेल्या श्री गुरु दत्तात्रयांची दत्त जयंती यंदा बुधवार दि. ७ डिसेंबर रोजी आहे. या श्री दत्त जयंती सोहळ्यानिमत्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. श्री दत्त जयंती रोजी पुरोहित मोहनराव पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते चेअरमन महेश इंगळेंच्या प्रमुख उपस्थितीत श्रींची पहाटे ५ वाजता काकडआरती व सकाळी ११:३० वाजता नैवेद्य आरती संपन्न होईल.

रात्रीची शेजारती होणार नाही

यानंतर सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दुपारी ४ ते ५:३० या वेळेत दत्त जन्म आख्यान वाचन, व भजन करून सायंकाळी ६ वाजता स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्म सोहळा, आरती व पाळणा कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात संपन्न होतील. यानंतर श्री दत्त जन्म झाल्याने रात्रीची शेजारती होणार नाही.

रक्तदान शिबिराचे आयोजन

श्रीदत्त जन्मोत्सवाचे औचित्य साधून वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व डॉ. हेडगेवार रक्तपेढी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देवस्थानच्या दक्षिण महाद्वारालगत ऐच्छिक रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात

महानैवेद्य आरती नंतर मंदिर परिसरात प्रसाद वाटप

गुरुवार दिनांक ८ डिसेंबर रोजी पहाटेच्या काकड आरतीनंतर श्रीदत्त जन्मोत्सवानिमीत्त पुणे येथील श्री स्वामी समर्थ सेवा सार संघाच्या वतीने वटवृक्ष मंदिरात १५१ किलोचा केक कापण्यात येणार आहे व नंतर प्रसाद म्हणून वाटण्यात येईल. सकाळी ११:३० च्या महानैवेद्य आरती नंतर मंदिर परिसरात प्रसाद वाटप करणेत येईल. दुपारी १ ते ३ या वेळेत देवस्थानच्या भक्तनिवास भोजन कक्ष येथे स्वामी भक्तांना भोजन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ५ ते रात्री ९:३० या वेळेत सालाबादाप्रमाणे अक्कलकोट शहरातून सवाद्य संपन्न होणारा श्रींचा पालखी मिरवणूक परंपरेप्रमाणे संपन्न होईल. रात्री ९:३० नंतर पालखी सोहळा वटवृक्ष मंदिरात आल्यानंतर देवस्थानच्या वतीने प्रसाद वाटप होवून श्री दत्त जयंती सोहळ्याचा सांगता समारंभ होणार आहे. दत्त जयंती निमित्त होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणे करिता स्वामी भक्तांच्या वतीने होणारे अभिषेक होणार नाहीत जे स्वामीभक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना प्रसाद मिळेल. तरी सर्व भाविकांनी दत्तजन्म सोहळ्याचा, श्रींच्या दर्शनाचा व भोजन महाप्रसादाचा, व पालखी सोहळयाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here