निवडणुकीत पैसे वाटल्याची शिवसेना आमदाराची कबुली

0

पंढरपूर,दि.१९: साखर कारखाना निवडणुकीत पैसे वाटल्याची कबुली शिवसेनेच्या आमदाराने दिली आहे. शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील (MLA Shahaji Patil) यांनी साखर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये होत असलेला पैशांचा वापर आणि निवडणुकांचे धक्कादायक वास्तव समोर आणणारा मोठा गौप्यस्फोट केला आहे. आमदार शहाजी पाटील (MLA Shahaji Patil) एका कार्यक्रमात बोलताना निवडणूक जिंकण्यासाठी काय काय क्लृप्त्या केल्या, आमिषे दाखवली याचा एक प्रकारे कबुली जबाबच दिला. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांची माफीही मागितली.

काही वर्षांपूर्वी झालेल्या सांगोला सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतदारांना तीन- तीन हजार रुपये रोख वाटले, शिवाय त्यांना हव्या तितक्या पार्ट्याही दिली. त्या काळात ५७ लाख रुपये वाटून कारखान्याची निवडणूक लढवली, असा मोठा गौप्यस्फोट सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील  यांनी केला आहे. सांगोला सहकारी कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील आणि तालुक्यातील विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते. 

त्या काळात ५७ लाख रुपये वाटले

सांगोला साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांच्याकडे माझे काही संचालक घ्या, असा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी गणपतराव देशमुख यांनी वेळ निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर दिल्ली, हरियाणा, लुधियाना येथून विमानाने सभासदांना आणले. एवढेच नाही तर सभासदांना तीन तीन हजार रुपये वाटप केले. निवडणुकीदरम्यान १७०० सभासदांना कोल्हापुरात ठेवले. त्यांच्या खाण्यापिण्याची व पत्ते खेळण्यासाठी लागणारे पैसेही दिले, असे सांगत कारखान्याच्या दुरवस्थेला माझ्यासह सर्वच नेते जबाबदार आहेत. आपणही तितकेच पापी असल्याची कबुली पाटील यांनी दिली. 

साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांना पैसे वाटून आणि पार्ट्या करून कारखान्याच्या निवडणुकीत गणपतराव देशमुख गटाला कसा हिसका दाखवला, हे सांगताना आमदार पाटील यांनी कारखाना उभारणीमध्ये कोणी कोणी कसा गैरकारभार केला, याची उदाहणे दिली. कारखान्याच्या दुरवस्थेला आम्ही जबाबदार असल्याचेही मान्य केले. आमदार पाटील यांच्या कबुलीनंतर सहकारी साखर कारखान्यात चालणाऱ्या गैर कारभाराचे जळजळीत वास्तव आणि सत्य समोर आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here