मुंबई,दि.9: शरद पवार यांनी केलेल्या विधानाने चर्चांना उधाण आले आहे. पुढील दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय सर्वोत्तम आहे असे त्यांना वाटेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.
पुढील दोन वर्षांत विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष त्यांच्या हितासाठी काँग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांची एका इंग्रजी दैनिकाने नुकतीच मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी सद्य राजकीय परिस्थितीबद्दल भाष्य करताना हे विधान केले.
राष्ट्रवादी विलीन होणार का?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का, असा प्रश्नही पवार यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीच फरक नसून दोन्ही पक्ष गांधी, नेहरू विचारसरणीचे आहेत. वैचारिकदृष्टय़ा काँग्रेसच्या जवळ असलो तरी पक्षाबाबतचा निर्णय हा सहकाऱ्यांशी सल्ला केल्यानंतर सामूहिकरीत्या घेतला जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा समविचारी पक्षांबरोबर एकत्र काम करण्याबद्दल सकारात्मक आहेत. त्यांची विचारसरणीही आमच्यासारखीच आहे, असे मतही पवार यांनी व्यक्त केले.
नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे किंवा त्यांचे विचार पचनी पडणे, हे आमच्यासाठी अवघड असल्याचेही पवार म्हणाले. 1977 मध्ये विविध पक्ष एकत्र आले होते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर जनता पक्षाची स्थापना झाली आणि त्यांनी सरकार स्थापन केले. विरोधकांनी तेव्हाही पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता.
मोरारजी देसाई यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली. आता मोरारजी देसाईंपेक्षा राहुल गांधींना जास्त जण स्वीकारतात. समविचारी लोकांना एकत्र आणण्याबाबत राहुल यांनी चर्चाही केली असल्याचे पवार म्हणाले.