Sharad Pawar: “मी अजून…” शरद पवार यांचे वक्तव्य चर्चेत

0

खेड,दि.१७: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील खेड तालुक्यात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातून शरद पवारांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. मी अजून म्हातारा झालो नाही. भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद माझ्यात आहे, अशा आशयाचं वक्तव्य शरद पवारांनी केलं. त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे होता? यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमात उपस्थित लोकांना संबोधित करताना शरद पवारांनी त्यांच्या वयाचा उल्लेख करणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल मिश्किल टिप्पणी केली. यावेळी शरद पवार म्हणाले, “तुम्हा लोकांबद्दल माझी एक तक्रार आहे. ती तक्रार अशी आहे की, तुम्ही तुमच्या सगळ्या भाषणांमध्ये मी ८४ वर्षांचा झालो, मी ८३ वर्षांचा झालो, असा उल्लेख करता. पण तुम्ही माझं काय बघितलंय. मी काही अजून म्हातारा झालो नाही.”

“लय भारी लोकांनासुद्धा सरळ करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. तुम्ही काही चिंता करू नका. तुमचं जे काही दुखणं असेल ते सगळं दुखणं दूर करण्यासाठी जे करायला लागेल? ते सगळं करू आणि नवीन इतिहास घडवू,” असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here