नवी दिल्ली,दि.१७: पाकिस्तानने गेल्या काही दशकांपासून जम्मू-काश्मीरच्या काही भागावर दावा सांगितला आहे. पाकव्याप्त काश्मीर असे त्या भागाला म्हटले जाते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारत PoK चा ताब्यात घेणार का? पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात सामील होणार का? अशा विविध चर्चांनी सध्या जोर धरला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणामुळे या चर्चा अधिकच तीव्र झाल्या आहेत. याच दरम्यान आता केंद्रीय गृह राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक (Nisith Pramanik) यांनी एका विशेष मुलाखतीत अतिशय महत्त्वाचे विधान केले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोणत्याही दिवशी तिरंगा फडकवला जाऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
अमित शहांच्या वक्तव्याबाबत काही दिवसांपूर्वीपासून चर्चा सुरू होतीच. त्यातच आता निशीथ प्रामाणिक यांनी टीव्हीनाइनबांगलाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे काटेकोर आणि ठाम प्रकारचे निर्णय घेणारे लोक असताना कोणताही निर्णय घेतला जाऊ शकतो. जर काश्मीरमधून कलम 370 हटवता येत असेल आणि लाल चौकात तिरंगा ध्वज फडकवता आला असेल तर एक दिवस तुम्ही सकाळी उठून पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा फडकतानाही पाहू शकता. तसे झाल्यास आश्चर्य वाटायला नको.”
“देशाचे नेतृत्व सध्या दोन बलवान लोक करत आहेत. ते देशाच्या सन्मानासाठी आणि हितासाठी आवश्यक ते सर्व काही करू शकतात. भाजपा पाकव्याप्त काश्मीरला भारताचा भाग मानते हे अनेकांनी स्पष्ट केले आहे. आम्ही सारेच तसे मानतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी PoK भारतात सामील होईल का, हे मी सांगू शकत नाही. पंतप्रधान आणि गृहमंत्री काम करण्यापूर्वी काही बोलत नाहीत. कलम ३७० हटवण्याच्या २ दिवस आधीपर्यंत याबाबत कोणतीही माहिती नव्हती. देशाच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी ते निर्णय घेतात,” असे प्रामाणिक यांनी स्पष्ट केले.
“पीओके अजूनही पाकिस्तानच्या ताब्यात आहे, परंतु तो भारताचा भाग आहे, यावर आमचा ठाम विश्वास आहे. काश्मीरमधील जागावाटपाच्या बाबतीत आम्ही पीओकेमधील जागा राखून ठेवल्या आहेत आणि उमेदवारांना नामनिर्देशित केले आहे. त्यामुळे मला इतकेच सांगायचे आहे की, पंतप्रधान आणि गृहमंत्री जे काही सांगतात, ते अंमलात आणतात,” असे सूचक वक्तव्यदेखील त्यांनी केले.