सोलापूर,दि.१४: जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्या आरोपींचा जामीन अर्ज सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जगताप यांनी फेटाळला आहे. यातील हकिकत अशी की, यातील फिर्यादी किरण रेणव साळवे हे सोलापूर येथील हॉटेल मध्ये मॅनेजर म्हणून काम करत असताना हॉटेल मालकाच्या मुलाने म्हणजेच सदर प्रकरणातील आरोपी क्र. १ बाबासाहेब मनोहर सपाटे याने दिनांक १३/१०/२०२१ रोजी रात्री १२.४५ वाजता हॉटेलमध्ये येवून फिर्यादीस लाईट बंद का केलेत, तुम्ही झोपला होता काय? असे जोरात ओरडून एका इसमाकडे बोट करून, हे कस्टमर थोडया वेळापूर्वी येवून गेले होते, तुम्ही झोपा काढता काय असे म्हणाले नंतर किरण साळवे यांनी त्यांना हे कस्टमर आलेले नाहीत, मी जागाच आहे, असे म्हणाले तेंव्हा, बाबासाहेब सपाटे याने, तु मला कधीही उलटेच बोलतो, तु वडीलांचे नांव घेवून मला भिती दाखवितो, असे म्हणून फिर्यादीचे अंगावर धावून येवून शिवीगाळ करत मारहाण करु लागला.
त्यावर फिर्यादीने तुमचा गैरसमज होत आहे. हवे तर मी मालकांना सांगुन काम सोडतो, असे म्हणून मालक राहत असलेले चौथ्या मजल्याकडे पायऱ्यावरुन चालत जात असताना, बाबासाहेब सपाटे याने पाठीमागून येवून किरण साळवे यास जातीवाचक शिवीगाळ करत घालून पाडून बोलत हॉटेल मालकाकडे घेवून गेले असता आरोपी क्र.२ नगरसेवक मनोहर गणपत सपाटे यांनी कामगाराला का मारतोस, सोड त्याला असे म्हणून किरण साळवे याचे म्हणणे ऐकूण घेवून बाबासाहेब सपाटे यास घरात पाठवून दिले.
सदर घटने बाबत किरण साळवे याने फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे रितसर फिर्यादी दाखल केली. त्यानुसार पोलीसांनी योग्य ती फिर्याद दाखल करून पुढील तपास केला.
त्यानंतर दिनांक १३/१०/२०२१ रोजी रात्री ९ वाजता आरोपी क्र. २ मनोहर सपाटे हे फिर्यादीचे राहते घरी गेले व त्याठिकाणी फिर्यादीची पत्नीस फिर्यादीबाबत विचारपूस करून त्याला तक्रार मागे घ्यायला लावा, नाहीतर त्याला कुठल्या कुठे पोहचविन, असा दम देवून निघून गेले होते. त्यामुळे यातील फिर्यादी किरण रेणव साळवे रा. १८३ मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर आरोपी बाबासाहेब मनोहर सपाटे व मनोहर गणपत सपाटे यांचेविरुध्द फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापूर येथे फिर्याद दिली असता पोलीसांनी भा.दं.वि. कलम ३२३, ५०४, ५०६ व अ.जा.अ.ज. कलम ३ (१) (आर) (एस). ३ (२)(५अ) प्रमाणे गुन्हा नोंदवला असता यातील आरोपी नं. १ बाबासाहेब मनोहर सपाटे याने त्याला अटक होईल म्हणून न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज दखल केला होता.
परंतु सदर प्रकरणात सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदिपसिंग राजपूत व सहाय्यक सरकारी वकील ॲड. दत्ता पवार यांनी जोरदार हरकत घेत म्हणणे मांडून असा युक्तीवाद केला की, सदर प्रकरणातील फिर्यादी व आरोपी हे परस्परांचे ओळखीचे आहेत. त्यांना एकमेकांची जात माहित आहे. असे असताना सुध्दा फिर्यादीस तुच्छ भावनेने शिवीगाळ करुन मारहाण केल्याचे न्यायालयास सांगितले तसेच आरोपी क्र. २ मनोहर सपाटे हे राजकीय पुढारी असून ते व आरोपी क्र. १ बाबासाहेब सपाटे हा गुंड प्रवृत्तीचा आहे. तसेच त्यांना जामीन मंजुर झाल्यास ते फिर्यादीस पुन्हा मारहाण करून तपास कामात हस्तक्षेप होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. तसेच आरोपी क्र. १ व २ यांचे विरुध्द सरकारपक्षाकडे भक्कम पुरावा आहे. आरोपी हे सरकारी साक्षीदार फोडू शकतात त्यामुळे त्यांना जामीन देण्यात येवू नये असे, न्यायालयाच्या निदर्शनास सरकारपक्षाने युक्तीवादात आणून दिले. न्यायालयाने सरकारपक्षाचा युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
सदर प्रकरणात सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदिपसिंग राजपूत व सहाय्यक सरकारी वकील ॲड. दत्ता पवार यांनी काम पाहिले. तर आरोपीतर्फे ॲड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.