सोलापूर,दि.9: संग्रामनगर, तालुका माळशिरस येथे टोळीयुद्धातील पूर्ववैमानस्यातुन गोळीबार करून नाना दिलीप आसबे यांचा खून केल्याप्रकरणी माळशिरस सत्र न्यायालयात मोक्का कायद्यानुसार आठ आरोपींविरुद्ध दाखल असलेल्या खटल्यामधील आरोपी नं. 6 राजू मधुकर भोसले वय 40 वर्षे, रा. माळशिरस याने दाखल केलेला जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
यात हकीकत अशी की, दि.29/12/2016 रोजी सकाळी 10.15 वाजणेचे सुमारास फिर्यादी अनिकेत जालिंदर उंबरे व फिर्यादीचे नातेवाईक मामा नानासाहेब दिलीप आसबे असे दोघेजण अश्विनी हॉस्पिटल समोरील लोखंडी बाकड्यावर बसलेले होते. त्यावेळी दोन इसम हे त्यांचे जवळ आले व त्यापैकी एकाने पूर्व वैमनस्यातुन नाना आसबे यांचेवर बंदुकीने गोळी झाडली त्यामुळे नाना आसबे हे पळू लागले, त्याचवेळी त्या दोघांनी त्याचे हातातील दोन बंदुकीने नानाचे डोक्यात, उजवे हाताला गोळ्या झाडल्या त्यामुळे नाना आसबे मोठ्या जखमा होऊन खाली पडले व त्या लोकांनी झाडलेल्या गोळीचे चरे फिर्यादीचे उजवे खांद्यावर व उजवे हाताचे कोपऱ्यावर लागून फिर्यादी जखमी झाला.
त्यानंतर दोन्ही मारेकरी दुचाकी वरून निघून गेले. उपचारादरम्यान फिर्यादीचे मामा नानासाहेब आसबे हे मयत झाले. अशा आशयाची फिर्याद पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली. तद्नंतर फिर्यादी हा त्याचे गावी असताना पोलिसांनी नानासाहेब आसबे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन इसमापैकी देवा जाधव याला अटक केली. त्याने प्रदीप पांडुरंग माने, रमेश विश्वनाथ धुळे, दशरथ विठोबा माने, राजू मधुकर भोसले, साजिद इब्राहिम सय्यद, सागर प्रताप मोहिते, सचिन दामोदर एखतपुरे यांनी संगनमत करून व कट रचून खून केल्याचे कबूल केले.
प्रस्तुत गुन्ह्यामध्ये पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केलेली असून आरोपी नं 7 वगळता सर्व आरोपी हे अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत, पोलिसांनी सर्व आरोपी विरुद्ध तपास करून मोक्का कायद्याच्या आरोपाखाली मे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
यात आरोपी नं 6 राजू मधुकर भोसले याने गेल्या 5 वर्षेहून अधिक काळापासून कारागृहात असल्याने त्यास जामिनावर मुक्त करावे यासाठी जामीन अर्ज दाखल केलेला होता.
यात सरकारपक्षातर्फे युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील ॲड. संतोष न्हावकर यांनी आरोपी नं 6 यानेच खून करण्यासाठी बंदूक, छररे आणि मोटारसायकलचा पुरवठा केलेला असलेबाबतचा स्वकृतदर्शनी पुरावा असलेचा युक्तिवाद केला तसेच जास्त काळ कारागृहात राहिल्याचा मुद्दा जामीनास पात्र ठरू शकत नाही. असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व त्यापृष्ठयर्थ सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले. तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने राजू मधुकर भोसले याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील ॲड. संतोष न्हावकर तर आरोपीतर्फे ॲड शेख यांनी काम पाहिले.