श्री सिध्देश्वर महाराजांची महती सांगणाऱ्या दिनदर्शिकेचे संभाजी आरमारने केले प्रकाशन

0

सोलापूर,दि.३०: दिनदर्शिकेच्या माध्यमातून शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या महतीचा जागर करण्याच्या हेतूने संभाजी आरमारच्यावतीने २०२४ सालची अनोखी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. श्रीक्षेत्र काशी पीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते अक्कलकोट रोडवरील मठामध्ये हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर सोलापूरचे ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी श्रीक्षेत्र श्रीशैलम येथे श्री सिद्धेश्वर महाराज व भगवान शंकराच्या भेटीचा प्रसंग दर्शविणारे अप्रितम चित्र रेखाटले आहे. आतील सर्व पानांवर श्री सिद्धेश्वर महाराजांचे आध्यात्मिक कार्य, गड्डा यात्रेतील विधी, परंपरा आदींची माहिती दिली आहे.

याप्रसंगी अखिल भारतीय पद्म्ब्राह्मण पुरोहित संघाचे अध्यक्ष पंडित वेणुगोपाल जिल्ला, संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे, सिद्धी डेव्हलपर्सचे राम कबाडे, वीट उत्पादक महेश घोडके यांची उपस्थिती होती.

संभाजी आरमारच्या कार्याचे कौतुक

याप्रसंगी बोलताना जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी संभाजी आरमार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराने करत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या चरित्राची महती सांगणारी दिनदर्शिका प्रकाशित करून आध्यत्मिक क्षेत्रात देखील देत असलेल्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले. या दिनदर्शिकेमुळे घरोघरी ग्रामदैवताच्या चरित्राची पारायणे होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सिद्धेश्वर महाराजांमुळे जगभरात सोलापूरची ओळख

आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी ज्या शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांमुळे जगभरात सोलापूरची ओळख आहे त्यांच्या उत्तुंग आध्यत्मिक तसेच समतावादी कार्याचा प्रचार जनमाणसापर्यंत पोचविण्याचा हेतूने संभाजी आरमारने ही दिनदर्शिका प्रकाशित केली असल्याचे सांगितले.

या प्रकाशन सोहळ्यास संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, सरचिटणीस गजानन जमदाडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ, शहरप्रमुख सागर ढगे, संपर्कप्रमुख गिरीश जवळकर, उपशहरप्रमुख राज जगताप, प्रभागप्रमुख मल्लिकार्जुन पोतदार, द्वारकेश बबलादीकर, लक्ष्मीकांत आडम, स्वप्नील इराबत्ती, राजू रच्चा, नागेश कणगी, बाळासाहेब वाघमोडे, रेखा व्हनकडे, पद्मा द्यावानपल्ली आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here