Home चित्रपट Salman Khan: अभिनेता सलमान खानने मागितली माफी; ‘त्या’ घटनेनंतर थेट इन्स्टाग्रामवर केली...

Salman Khan: अभिनेता सलमान खानने मागितली माफी; ‘त्या’ घटनेनंतर थेट इन्स्टाग्रामवर केली पोस्ट

0

मुंबई,दि.२०: ‘बिग बॉस २०’ च्या एका प्रोमोमुळे बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) आरोग्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली होती. मात्र, आता स्वतः सलमानने पुढे येत या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आहे. आपली प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट करत त्याने या गोंधळाबद्दल थेट चाहत्यांची माफीही मागितली आहे.

नेमका काय होता तो प्रकार?

‘वीकेंड का वार’च्या प्रोमोमध्ये सलमान अचानक छातीला हात लावून वेदना होत असल्याचे दाखवत स्टेजवर खाली झोपताना दिसला होता. त्याने डॉक्टरांना बोलावण्यास सांगितल्याचेही प्रोमोमध्ये दाखवले गेले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि चाहत्यांमध्ये त्याच्या तब्येतीविषयी चिंता निर्माण झाली.

सलमानने दिली ही कबुली

चाहत्यांची चिंता वाढल्याचे पाहून सलमानने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे खरी परिस्थिती स्पष्ट केली. तो म्हणाला, “देवाच्या कृपेने माझी प्रकृती एकदम उत्तम आहे.”

हा अभिनय का करावा लागला, यावर बोलताना त्याने सांगितले की, “घरातील स्पर्धक काजी तौकीर याने तब्येतीचे नाटक करून सर्वांना घाबरवले होते. आरोग्याचा असा मनोरंजनासाठी वापर करणे किती गंभीर ठरू शकते, हे काजीला समजावण्यासाठीच मी तो अभिनय केला होता.”

वाहिनीच्या चुकीमुळे मागितली माफी

प्रोमोच्या एडिटिंगवर बोट ठेवताना सलमान म्हणाला, “हा प्रोमो ज्या पद्धतीने कट करण्यात आला, त्यामुळे मूळ संदेश बाजूला राहिला आणि लोकांचा गैरसमज झाला.” वाहिनीच्या या चुकीच्या एडिटिंगमुळे चाहत्यांना मनस्ताप सहन करावा लागल्याने त्याने चॅनेलच्या वतीने सर्वांची क्षमा मागितली.

दरम्यान, सलमानच्या या स्पष्टीकरणानंतर निर्मात्यांनी प्रोमोमध्ये सुधारणा केली असून त्याच्या तब्येतीबाबतच्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.