S. Somanath On Temple: इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी सांगितले देवळांत का जातो?

0

मुंबई,दि.२८: S. Somanath On Temple: चंद्रयान-३ मोहिमेला मिळालेल्या यशामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. संपूर्ण जगात भारताचं कौतुक झालं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानाचं सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा विदेश दौरा संपल्यानंतर बंगळुरू या ठिकाणी पोहचून इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. त्यानंतर रविवारी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी तिरुवनंतपुरम या ठिकाणी जाऊन भद्रकाली देवीचं दर्शन घेतलं. आपण देवळांत का जातो त्यांचं कारणही एस. सोमनाथ यांनी सांगितलं.

देवळात का जातो? | Somanath On Temple

मी शास्त्रज्ञ आहे आणि शोध घेणं हे माझं काम आहे. मी चंद्राबाबत शोध घेतो अगदी त्याचप्रमाणे अध्यात्माचाही शोध घेतो. दोहोंमध्ये नवनव्या गोष्टी शोधणं मग ते विज्ञान असो की अध्यात्म मला आवडतं. याच कारणांसाठी मी मंदिरांमध्येही जातो, धर्मग्रंथ वाचतो. आपल्या ब्रह्मांडाचा शोध घेणं जसं महत्त्वाचं आहे तसंच आपल्या अस्तित्वाचा शोधही आवश्यक आहे. मंदिरं ही आपल्या संस्कृतीचा एक भाग आहेत. ब्रह्मांडात काय दडलंय यासाठी शास्त्रीय प्रयोग आवश्यक आहेत आणि आत्म्याला शांतता लाभली पाहिजे यासाठी मंदिरात येणं आवश्यक आहे. असं ही सोमनाथ यांनी म्हटलं आहे.

शिवशक्ती नाव देण्यात चुकीचं काहीही नाही

चांद्रयान ३ च्या टचडाऊन पॉईंटला शिवशक्ती नाव देण्यात चुकीचं काहीही नाही असंही एस. सोमनाथ यांनी म्हटलं आहे. शिवशक्ती आणि तिरंगा ही दोन्ही नावं भारतीय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा अर्थही सांगितला आहे. आपण जे काही करतो आहोत त्याचं एक महत्त्व आहे, ते असलंच पाहिजे. तसंच देशाचे पंतप्रधान या नात्याने टचडाऊन पॉईंटला नाव देणं हा त्यांचा विशेषाधिकार आहे. शिवशक्ती या नावात काहीच गैर नाही असं सोमनाथ यांनी म्हटलं आहे.

चांद्रयान ३ यशस्वी झाल्यानंतर आता विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे उत्तम प्रकारे काम करत आहेत. पाचही उपकरणं सुरु आहेत. तिथून मिळणारी माहिती ही आपल्यासाठी महत्त्वाची ठरते आहे ३ सप्टेंबरपर्यंत आपल्याला ही माहिती मिळू शकणार आहे असंही सोमनाथ यांनी स्पष्ट केलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here