सोलापूर,दि.१५: येथील नूमवि मराठी शाळेतील उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका रोहिणी सचिन चौधरी यांची यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्यातर्फे शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन साठी निवड झाली आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्यावतीने मानाची समजली जाणारी फेलोशिप शिक्षण क्षेत्रातील गुणवंत शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून दिली जाते. कृषी, साहित्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात दरवर्षी अशी फेलोशिप जाहीर होते. शिक्षण क्षेत्रात २० प्राथमिक शिक्षक आणि १० माध्यमिक शिक्षकांना ही फेलोशिप दिली जाते.
यासाठी राज्यभरातून ७३० जणांनी अर्ज केले होते. या फेलोशिपचे स्वरूप ६० हजार रुपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. फेलोशिप प्रदान सोहळा ८ डिसेंबर रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. अनिल काकोडकर, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, एमकेसीएलचे विवेक सावंत, डाँ. चारुदत्त माई, सह्याद्रीचे विलास शिंदे, साहित्य फेलोशिपचे समन्वयक प्रा. नितीन रिंढे उपस्थित होते.
या यशाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन, मुख्याध्यापिका वर्षा जेधे, मोतीबने, नूमवि शिशु शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांनी चौधरी यांचा सत्कार केला.