मुंबई,दि.30: महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महाविकास आघाडीमधील मैत्रीपूर्ण लढतीवर मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबरला होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी अर्ज दाखल करण्यात आले असून आम्ही एकजुटीने निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहोत. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. आमच्यात मैत्रिपूर्ण लढत होणार नाही. तसेच बंडोबांचीही व्यवस्था करण्यात आली आहे, असे रमेश चेन्नीथला म्हणाले.
सोलापूरसह राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चेन्नीथला यांनी जागावाटपावरून महायुतीत उडालेल्या गोंधळावरही भाष्य केले. महायुतीमध्ये आपापसात भयंकर लढाई सुरू असून भाजप नेत्यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या जागांवर डल्ला मारलेला आहे. भाजपने या निवडणुकीत शिंदे आणि अजित पवार यांना संपवले आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांसह छोट्या मित्रपक्षांनाही समान वागणूक देण्यात आली आहे.
महायुतीमध्ये भाजपचे नेते शिंदे गटाच्या, अजित पवार गटाच्या चिन्हावर लढत आहे. याचा अर्थ भाजप 180 ते 182 जागा लढत असून महाविकास आघाडीत असे कोणतेही मतभेद नाहीत. बंडखोरांचे अर्ज मागे घेण्याचीही व्यवस्था केलेली आहे. हायकमांडने घोषणा केलेल्या उमेदवारांनाच आम्ही एबी फॉर्म दिला असून यादी जाहीर झाली त्यांचेच काम करा, असे निर्देश चेन्नीथला यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले.