शिवाजी महाराजांच्या विचारांना काहीच अर्थ नाही का; राज ठाकरेंचा शरद पवारांना सवाल

राज ठाकरे: शरद पवार आजपर्यंत व्यासपीठावर भाषण करताना कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नव्हते

0

सिंधुदुर्ग,दि.१: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार आजपर्यंत व्यासपीठावर भाषण करताना कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नव्हते. शिवरायांचं नाव घेतली की मुस्लीम मतं जातील, या भीतीने शरद पवार हे शिवाजी महाराजांचं नाव घेणं टाळतात, असा थेट आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला.

मी शरद पवारांना ते व्यासपीठावर फक्त शाहू-फुले-आंबेडकरांचा उल्लेख का करतात? शिवाजी महाराजांचं नाव का घेत नाहीत, असा सवाल विचारला होता. त्यावर शरद पवार यांनी म्हटले होते की, शाहू-फुले-आंबेडकर हा एक विचार आहे. मग शिवाजी महाराजांच्या विचारांना काहीच अर्थ नाही का, तो विचार नव्हता का? शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा मूळ पाया हा शिवाजी महाराज हेच होते ना, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ते गुरुवारी सिंधुदुर्ग येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी राज ठाकरे यांनी सध्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांशी संबंधित इतिहास आणि आक्षेपार्ह वक्तव्यांवरुन सुरु असलेल्या वादाबाबत भाष्य केले. सध्या कोणीही एवढीशी गोष्ट बोलतं आणि वाद निर्माण होतात. या सगळ्याचा वापर जातीच्या राजकारणासाठी केला जात आहे. यापूर्वीच्या लोकांना इतिहास कळतच नव्हता का? आता यांनाच सगळा इतिहास अचानक कळायला लागला आहे का? महाराष्ट्रात हे सगळे प्रकार १९९९ पासून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून सुरु झाले आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

शरद पवार आजपर्यंत त्यांच्या भाषणात कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचे नाहीत. शिवरायांचं नाव घेतली की मुस्लीम मतं जातात. मग कुठल्यातरी टोळ्या उभ्या करायच्या. त्यांच्याकडून शिवाजी महाराजांचं राजकारण करुन घ्यायचे. जेणेकरुन मराठा समाज आणि उर्वरित घटकांमध्ये फूट पाडता येते. फक्त यासाठीच प्रयत्न करायचा. मग दोन्ही बाजूंची मतं खिशात घालायची, ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राजकारणाची पद्धत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

मावळ्यांची जी नावं ऐकली आहेत, ती काल्पनिक आहेत

यावेळी राज ठाकरे यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटावरून रंगलेल्या वादासंदर्भातही भाष्य केले. या चित्रपटाच्या दिग्दशर्काने ज्या सहा जणांची नावं टाकली, ते मावळे प्रतापराव गुजरांसोबत लढाईत नव्हते, असा काहीजणांचा दावा आहे. मी इतिहास तज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली. तेव्हा इतिहासाचे अभ्यासक गजानन मेहंदळे यांनी सांगितले की, जगात इतिहासाच्या कोणत्याही पुस्तकातील पानावर प्रतापराव गुजर यांच्यासोबत आठ, दहा किंवा पाच किती मावळे होते, असं कुठेही लिहलेले नाही. कुठेही याचा पुरावा नाही. आतापर्यंत आपण मावळ्यांची जी नावं ऐकली आहेत, ती काल्पनिक आहेत. छत्रपती शिवाजी महाहाजांनी जे पत्र पाठवले, त्यामध्येही कुठेही असा उल्लेख नाही. केवळ एका पत्रात,’ प्रतापराव गुजर मारियेला आणि प्रतापराव गुजर पडला’ एवढाच उल्लेख आहे. बाकी इतिहासामध्ये या लढाईविषयी विस्तृत माहिती उपलब्ध नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

त्या आधारे इतिहासकार तर्क मांडतात

इतिहास नुसता सांगायला गेला की तो भयंकर रुक्ष आहे. अनेकदा तो पोवाडे रचून, स्फुरण चढेल अशा केवळ तर्कावर आधारित असणाऱ्या कथांमधून सांगितला जातो. पोवाडे रचले जातात, तशाच या गोष्टी उभ्या केल्या जातात. इतिहासाच्या बखरींमध्ये जे संदर्भ सापडतात, त्या आधारे इतिहासकार तर्क मांडतात. मूळ पुरुषाला आणि इतिहासाला धक्का न लावता मांडणी केली जाते, असे राज ठाकरे यांनी म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here