‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाबाबत राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य

राज ठाकरे यांनी चित्रपटातील ऐतिहासिक तथ्यांबाबत झालेल्या वादावर भाष्य केलं आहे

0

सिंधुदुर्ग,दि.१: ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावरून वाद सुरू आहे. अलीकडच्या काळात ऐतिहासिक चित्रपटात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप होत आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातही चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांनी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातील ऐतिहासिक तथ्यांबाबत झालेल्या वादावर भाष्य केलं आहे. “याबाबत मी इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्याशी बोललो. त्यांनी गजानन मेहंदळे म्हणतात ते खरं असल्याचं सांगितलं,” अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. ते सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी (१ डिसेंबर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “जातीपलिकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं आहे. सध्या जातीतून इतिहास पाहण्याचं पेव फुटलं आहे. ठराविक मुठभर लोकच असं करत आहेत. त्यात त्यांचा राजकीय स्वार्थ आहे.”

“छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर मुस्लिम मतं जातात म्हणून राष्ट्रवादी शिवरायांचं नाव घेत नसे. म्हणून मग राष्ट्रवादीला हवा तसा शिवरायांचा इतिहास सांगण्यासाठी काही टोळ्या उभ्या करायच्या आणि त्यावर मग राजकारण करायचं.” असेही राज ठाकरे म्हणाले.

तेव्हा मी तज्ज्ञ मंडळींशी बोलतो

“‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या कार्यक्रमात मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होतो. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सहा जणांची नावं टाकली. मग कोणीतरी बोललं ही सहा नावं नाहीत, तर ही सहा नावं आहेत. गंमत बघा, मला जेव्हा इतिहासाबद्दल कुतुहल वाटतं तेव्हा मी तज्ज्ञ मंडळींशी बोलतो. आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

मी यावर काल पवार साहेबांशीही बोललो

राज ठाकरे पुढे म्हणाले, “मध्यंतरी मी गजानन मेहंदळे यांना भेटलो. मी त्यांना विचारले की, वेडात मराठे वीर दौडले सातबाबत कोणी ही सहा नावं सांगत आहे, तर कोणी ती नावं सांगत आहेत. तुमचं म्हणणं काय? मी यावर काल पवार साहेबांशीही बोललो. ते मला म्हणाले की, गजाननराव बरोबर बोलत आहेत.”

ती सर्व काल्पनिक नावं आहेत

“गजाननराव इतिहासाचे दाखले आणि संदर्भ यांचे ते अभ्यासक आहेत. मी मेहंदळे सरांना हे काय आहे असं विचारलं. ते शांत बसले आणि म्हणाले की, जगातल्या कोणत्याही इतिहासाच्या पानावर ते सात होते की आठ होते की दहा होते हे कोठेही लिहिलेलं नाही. प्रतापराव गुजर यांच्याबरोबर कोणत्या नावाचे कोण लोक होते याचा जगाच्या इतिहासात काहीही दाखला नाही. आतापर्यंत आपण जी नावं ऐकली ती सर्व काल्पनिक नावं आहेत,” असं राज ठाकरेंनी म्हटलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here