मुंबई,दि.२०: Raj Thackeray On Landslide: ११ जून २०२३ लाच राज ठाकरेंनी दरड दुर्घटनेचा इशारा दिला होता. खालापूर तालुक्यातील इर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळून अंदाजे २५ ते ३५ घरं माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचं सांगितलं जात आहे. खालापूर परिसरात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असून एनडीआरएफसह इतर बचाव पथकांना मदतकार्य करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योमंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आदिती तटकरे ही नेतेमंडळीदेखील इर्शाळवाडीत दाखल झाली आहे. एनडीआरएफच्या बचाव पथकांसह पनवेल महापालिकेचं बचाव पथक, सिडकोचे मजूर इर्शाळवाडीत मदतकार्यासाठी पोहोचले आहेत. त्यांच्याबरोबर स्थानिक ट्रेकर्सचे समूहदेखील मदतीसाठी हजर आहेत. (Raj Thackeray On Landslide)
राज ठाकरेंनी दिला होता इशारा | Raj Thackeray On Landslide
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या दुर्घटनेनंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. मनसेने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गेल्या महिन्यातील एका भाषणाचा काही भाग सोशल मीडियावर शेअर केला आहे. गेल्या महिन्यात कोकण दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी एका भाषणात कोकणात पावसाळ्यात दरडी कोसळतील, त्यामुळे प्रशासनाने सजग असावं असा इशारा दिला होता.
मनसेने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ११ जून २०२३ रोजी राज ठाकरे यांनी सांगितलं होतं, यावर्षी कोकणात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळतील असं दिसतंय, शासन-प्रशासनाने जागृत राहावं. २० जुलै २०२३ रोजी रायगडच्या इर्शाळवाडीवर मध्यरात्री दरड कोसळणं आणि अख्खं गाव जमीनदोस्त होणं, माणसं दगावणं हे अतिशय वेदनादायी आहे.
राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात भाषणादरम्यान म्हटलं होतं की, महाराष्ट्र सरकारने अशा नैसर्गिक दुर्घटनेत आपली माणसं मृत्यूमुखी पडू नयेत म्हणून उपाययोजना करणं गरजेचं आहे. डोंगरपायथ्याशी असणाऱ्या वाड्या-वस्त्यांचं पुनर्वसन कार्य हाती घ्यावं, पर्यावरण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन एक ‘पुनर्वसन योजना’ आणि डोंगरपायथ्याशी वस्ती असू नये किंवा बांधली जात असेल तर ती किती अंतरावर असावी याबाबत योजना आखावी.