परभणी,दि.6: Rain: मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाकडून परभणी जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात शुक्रवार (7 एप्रिल) आणि शनिवारी (8 एप्रिल) तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सचिव महेश वडदकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
परभणी जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी | Rain Alert
आधीच अतिवृष्टी आणि त्यानंतर मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका फळबागांना अधिक बसण्याची शक्यता आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
परभणी जिल्ह्यात विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे. मोकळ्या जागेत असल्यास किंवा जवळपास सुरक्षित ठिकाण नसल्यास सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे. विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीमध्ये आश्रय घ्यावा. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका, घरात असल्यास चालू विद्युत उपकरणे त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे.
तसेच पाण्यात उभे असल्यास तात्काळ बाहेर पडावे. तसेच नागरिक आणि शेतकऱ्यांनी आपला शेतमाल आणि पशुधन वेळेतच सुरक्षित जागी ठेवण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे सचिव श्री. वडदकर यांनी दिल्या आहेत. तसेच आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करणे टाळावे. शॉवरखाली आंघोळ करु नये. घरातील नळ, जलवाहिनींना स्पर्श करु नये आणि कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करणे टाळावे. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे वाहत असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबू किंवा शेड, तसेच उंच झाडांचा आसरा घेऊ नये. धातूच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नये. तसेच घरात असल्यास उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नये, अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव वडदकर यांनी दिल्या आहेत.