नवी दिल्ली,दि.२८: काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी टाटा समूह (Tata Group) बाबत एक मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधींनी दावा केला आहे की, टाटा समूहाला एका सुनियोजित व बेकायदेशीर मार्गाने उद्ध्वस्त केले जात असून, देशातील कोणताही व्यावसायिक या मुद्द्यावर उघडपणे बोलण्याची हिंमत दाखवत नाहीये. या कथित कृत्यांसाठी कायदेशीर व योग्य न्याय सुनिश्चित केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राहुल गांधींचे हे वक्तव्य अशा वेळी समोर आले आहे, जेव्हा टाटा समूहाची मुख्य होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्स (Tata Sons) च्या नेतृत्वावरून अंतर्गत वाद सुरू आहे. या वादानंतर टाटा ट्रस्ट्सच्या (Tata Trusts) पदाधिकाऱ्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले असून, हा संपूर्ण वाद आता टाटा सन्सच्या संचालक मंडळापर्यंत (Board of Directors) पोहोचला आहे.
टाटा सन्सच्या चेअरमनंच्या फेरनियुक्तीवरून वाद
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा ट्रस्ट्सचे चेअरमन नोएल टाटा (Noel Tata) यांनी एन. चंद्रशेखरन (N. Chandrasekaran) यांची पुन्हा एकदा टाटा सन्सचे चेअरमन म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला आव्हान दिले आहे. हा प्रस्ताव गत १७ सप्टेंबर रोजी टाटा सन्सच्या बोर्ड मीटिंगमध्ये संमत करण्यात आला होता. टाटा समूह हा देशातील सर्वात मोठा व्यावसायिक गट (business conglomerate) असल्याने, येथील नेतृत्वाचा वाद अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
केंद्र सरकारवर निशाणा
राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत म्हटले आहे की, टाटा समूहाला कथितरित्या बेकायदेशीर मार्गाने उद्ध्वस्त केले जात आहे आणि यावर कोणताही व्यावसायिक नेता काहीही बोलण्यास तयार नाही. त्यांनी सवाल केला की, व्यावसायिक आणखी किती काळ गप्प बसणार आहेत? काय ते तेव्हा बोलणार जेव्हा सर्वकाही त्यांच्या हातातून निघून जाईल?
राहुल गांधींनी पुढे बोलताना स्पष्ट केले की, भारतातील व्यवसाय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांचे वैयक्तिक खेळणे नाहीत. ते म्हणाले, “तुमच्यामध्ये (व्यापाऱ्यांमध्ये) हिंमत नसेल, पण आमच्यामध्ये ती आहे. आम्ही या सर्व कृत्यांविरोधात न्याय नक्की मिळवून देऊ.”
सरकार आणि टाटा समूहाकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
राहुल गांधींनी केलेल्या या गंभीर आरोपांवर केंद्र सरकार किंवा टाटा समूहाकडून अद्याप कोणतीही तात्काळ अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, टाटा सन्सच्या नेतृत्वावरून सुरू असलेला वाद आणि राहुल गांधींच्या या आक्रमक विधानामुळे राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात (business circles) जोरदार चर्चा सुरू झाली आहे.








