नवी दिल्ली,दि.१: जर तुम्ही NCR भागात वाहन चालवत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आता इंधन भरण्यासाठी फक्त खिशात पैसे असून चालणार नाही, तर तुमच्या वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC Certificate) वैध असणे आवश्यक आहे. आज १ ऑक्टोबरपासून या संपूर्ण भागात वैध PUC नसल्यास वाहनांमध्ये पेट्रोल किंवा CNG भरण्यावर कडक बंदी लागू करण्यात आली आहे.
हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हवेच्या गुणवत्तेच्या व्यवस्थापन आयोगाने (CAQM) हा निर्णय घेतला आहे.
ऑटोमॅटिक नंबर प्लेट स्कॅनरद्वारे थेट तपासणी
इंधन स्टेशनवर ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन’ (ANPR) सिस्टीम बसवण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे पेट्रोल पंपावर गाडी पोहोचताच नंबर प्लेटवरून वाहनाचे PUC वैध आहे की नाही, हे थेट सिस्टीममध्ये तपासले जाईल. PUC संपले असल्यास इंधन दिले जाणार नाही.
जुन्या वाहनांवर स्क्रॅपिंगची कुऱ्हाड!
प्रदूषण पसरवणाऱ्या जुन्या वाहनांवरही प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत:
BS-IV आणि त्याखालील जुनी वाहने: Non-BSIV आणि नियमांनुसार कालबाह्य ठरलेली व्यावसायिक तसेच मालवाहतूक वाहने या भागात आणण्यास बंदी घालण्यात आली आहे.
वाहने जप्त होणार: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जुन्या वाहनांना वाहतूक विभागाची पथके जप्त करून थेट ‘स्क्रॅपिंग’साठी (भंगारात) पाठवणार आहेत.
डिझेल ऑटो पूर्णपणे बंद: ३१ डिझेंबरपर्यंत डिझेल ऑटो-रिक्षा रस्त्यांवरून पूर्णपणे हटवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
यासोबतच पिकांचे अवशेष (पराली) जाळणे, रस्त्यावरील धूळ आणि बांधकाम क्षेत्रातील प्रदूषणावरही कठोर देखरेख ठेवली जात आहे.
वाहनधारकांसाठी महत्त्वाची टीप:
जर तुम्ही या परिसरात प्रवास करत असाल, तर तुमच्या वाहनाचे PUC त्वरित तपासून घ्या. मुदत संपली असल्यास आजच नूतनीकरण करून घ्या, अन्यथा इंधनाशिवाय परतावे लागू शकते.








