मुंबई,दि.३०: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या वतीने आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या आंदोलनाची पूर्वपाहणी करण्यासाठी गेलेल्या समन्वयकांना स्थानिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. आता याच विरोधावरून दादरमधील राजकीय वातावरण तापले असून, स्थानिकांचा हा विरोध बनावट असल्याचा थेट आरोप सीजेपीचे नेते अभिजीत दीपके यांनी केला आहे.
‘लोकल अंकल… किमान शर्ट तरी बदलून घ्यायचा!’
आंदोलनाला ‘स्थानिक दादरकर’ म्हणून विरोध करणारे प्रकाश बेलवाडे हे प्रत्यक्षात भाजपचेच सक्रिय कार्यकर्ते असल्याचा पर्दाफाश दीपके यांनी केला आहे. बेलवाडे यांचा भाजप नेते आणि राज्यमंत्री आशिष शेलार यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट करत अभिजीत दीपके यांनी अत्यंत खोचक टोला लगावला. “लोकल अंकल, विरोध करायला येताना किमान अंगातील शर्ट तरी बदलून घ्यायचा,” अशी उपरोधिक टिप्पणी करत दीपके यांनी भाजपवर बनावट विरोधाचे नाटक रचल्याचा आरोप केला.
‘शिवाजी पार्क काय यांच्या बापाचं आहे का?’ — मनसेचा संताप
या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उडी घेतली असून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी विरोध करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला.
“शिवाजी पार्क ही काही ठराविक लोकांची खासगी मालमत्ता नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून अनेक ऐतिहासिक आंदोलनांचा हे मैदान साक्षीदार राहिलं आहे. स्थानिकांच्या बुरख्याखाली विरोध करणारे हे भाजपचेच पाठीराखे आहेत,” असा घणाघाती आरोप देशपांडे यांनी केला. देशात आणि निवडणुकीत झालेल्या कथित गडबडीविरोधात नागरिक रस्त्यावर उतरत असतील, तर त्याला असा राजकीय हेतूने विरोध करणे चुकीचे असल्याचे सांगत, “जनता योग्य वेळी यांना रस्त्यावरच उत्तर देईल,” असा इशाराही त्यांनी दिला.








