राष्ट्रवादी पक्षाबाबत निवडणूक आयोगाकडून निकालसंदर्भात प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा

0

मुंबई,दि.२८: Praful Patel On NCP Crisis: राष्ट्रवादी पक्षाबाबत निवडणूक आयोगाकडून निकालसंदर्भात प्रफुल्ल पटेल यांनी मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांनी बंडखोरी केली. सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर दावा केला. यावरून केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गट आणि शरद पवार गटाला नोटीस बजावली होती. मात्र, यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे येणार असून, घड्याळ हे पक्षचिन्हही मिळेल, असा मोठा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर याबाबत एक तारीखही सांगून टाकली आहे, असे सांगितले जात आहे. 

प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा | Praful Patel On NCP Crisis

राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही आणि अजित पवार यांनी निर्णय घेतला आहे. काही लोक म्हणतात की, पक्षात फूट नाही. हेच आम्हीही म्हणतो आहे. अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये हा राष्ट्रवादी पक्षाचा निर्णय आहे. या निर्णयाचे समर्थन आपण सर्वांनी करावे. राजकारणात अनेक प्रसंग येत असतात. अनेक अशा घडामोडी होत असतात. त्यामुळे आयुष्यात कधी महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात. असाच आम्ही सर्वांनी मिळून हा सामूहिक निर्णय घेतला आहे. हा लोकशाही पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. 

पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवारांकडेच राहणार

लोकांच्या मनात शंका आहे की, राष्ट्रवादी पक्ष खऱ्या अर्थाने कोणाकडे राहणार आहे. त्यामुळे सर्वांना आवर्जून सांगतो की, राष्ट्रवादी पक्षाबाबत निवडणूक आयोगाकडून ३० सप्टेंबरपर्यंत निकाल येईल. हा निकाल शंभर टक्के अजितदादांच्या नेतृत्वाच्या मागे उभा राहणार आहे. तसेच पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवारांकडेच राहणार आहे. अनेक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अनेकजण आपापल्या भूमिका मांडत आहे. पण आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. 

दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटाकडून तयारी सुरु असून, आता कायदेशीर लढाई पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाकडून शपथपत्र भरुन घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात अजित पवार गटाकडून कार्यकर्त्याचे शपथपत्र भरुन घेण्यात येत आहेत. तसेच निवडणूक आयोगात हे शपथपत्र दाखल केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here