पश्चिम महाराष्ट्रात २० हजार ग्राहकांची वीज खंडित

0

सोलापूर,दि.२७: वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १५ लाख ७४ हजार ५८० वीजग्राहकांकडे ३१० कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यात सर्वाधिक घरगुती १३ लाख ९८ हजार ४४९ ग्राहकांकडे २१८ कोटी ३० लाख तसेच वाणिज्यिक १ लाख ५२ हजार ९०० ग्राहकांकडे ६२ कोटी ९ लाख तर औद्योगिक २३ हजार २३१ ग्राहकांकडे २९ कोटी ७८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणकडून वसूली मोहिमेला वेग देण्यात आला असून या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

दरम्यान, वीजबिलांच्या थकबाकीमुळे गेल्या २५ दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक २० हजार ३२८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्हा- ११,१८२ सातारा- १८२३, सोलापूर- ६००८, कोल्हापूर- २०९४ आणि सांगली जिल्ह्यातील २७७६ थकबाकीदारांचा समावेश आहे.

पुणे प्रादेशिक विभागात सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे (कंसात ग्राहक) पुणे जिल्हा- १९८ कोटी ३ लाख रुपये (७,७६,४९८), सातारा- २२ कोटी २ लाख (१,८६,४७९), सोलापूर- ४९ कोटी ०६ लाख (२,५३,९३९), कोल्हापूर- २० कोटी ३३ लाख (१,७७,९३८) आणि सांगली जिल्ह्यात २० कोटी ७३ लाख रुपयांची (१,७९,७२६) थकबाकी आहे. वीजबिलांचा नियमित भरणा होत नसल्याने महावितरणची आर्थिक कसरत सुरू आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी चालू व थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

थकबाकीदारांकडून वीजबिलांच्या रकमेचा भरणा होत नसल्याने नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई वेगाने सुरू करण्यात आली आहे. आता थकीत रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. तसेच थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरु आहे. यात परस्पर इतर ठिकाणावरून अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याचे आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.

शनिवारी व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू– पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. ३०) व रविवारी (दि. ३१) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे.

यासोबतच वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर तसेचमहावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीनेविनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here