सोलापूर,दि.27: महाऊर्जामार्फत पीएम-कुसुम घटक-ब योजना राबविण्यात येत असून, या योजनेत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कृषीपंप खरेदीसाठी अनुदान देण्यात येते. मात्र बनावट संकेतस्थळाद्वारे काही शेतकऱ्यांची फसवणुक झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सावधानता बाळगून संपर्क करण्याचे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक ए .व्ही. कुलकर्णी यांनी केले आहे.
प्रधानमंत्री कुसूम योजनेत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या तीन, पाच व साडेसात अश्वशक्ती (एचपी) कृषीपंपांसाठी अनुदान देण्यात येते. यात सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के तर अनुसूचित जाती व अनूसचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के अनुदान देण्यात येते.
सौर कृषिपंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यास 10 टक्के आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा संदेश (SMS) पाठविला जातो.शासनाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक बनावट संकेतस्थळव्दारे संदेश (SMS) महाकृषि ऊर्जा अभियान पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या नावाने शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी संदेशद्वारे (SMS) लिंक पाठविली जात आहे.पीएम-कुसुम घटक-ब योजनेसाठी सर्व शेतकऱ्यांना असे आवाहन करण्यात येते की, अशा खोट्या फसव्या संकेतथळांना भेट देऊ नये तसेच कोणत्याही प्रकारचा पैसे भरणा करू नये.
योजनेच्या अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) च्या अधिकृत संकेतस्थळाला (www.mahaurja.com) भेट द्या किंवा 020-35000450 वर संपर्क साधावा, असे आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक ए. व्ही. कुलकर्णी यांनी केले आहे.