मोदी मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांना येऊ लागले फोन

0

नवी दिल्ली,दि.9: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्पधानपदाची शपथ घेतील. एनडीएतील (NDA) अनेकजणांचा मंत्रीमंडळात समावेश केला जाणार आहे. नरेंद्र मोदींनी शपथ घेण्यापूर्वी मोदी मंत्रिमंडळातील संभाव्य मंत्र्यांपर्यंत फोन पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अद्याप अधिकृतपणे काहीही उघड झालेले नाही.

संभाव्य मंत्र्यांना येऊ लागले फोन

भाजप नेते पीयूष गोयल, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया, जेडीएस नेते कुमारस्वामी, एचएएम नेते जीतन राम मांझी, आरएलडी नेते जयंत चौधरी, एलजेपी (आर) नेते चिराग पासवान, जेडीयू नेते रामनाथ ठाकूर आणि अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांना मंत्रिपदाची शपथ घ्यावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. शिवसेना (शिंदे गट) खासदार प्रतापराव जाधव तसेच भाजपाच्या रक्षा खडसे यांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

चिराग पासवान यांच्या पक्ष एलजेपीआरने बिहारमधील पाच जागांवर निवडणूक लढवली होती आणि पाचही जागा जिंकल्या होत्या. चिराग स्वतः हाजीपूरमधून निवडणूक जिंकले होते. नागपुरातून निवडणूक जिंकून नितीन गडकरी पुन्हा एकदा संसदेत पोहोचले आहेत. गडकरी हे मोदी सरकारमध्ये सलग दोन वेळा मंत्री राहिले आहेत. जेडीयूचे खासदार रामनाथ ठाकूर हे राज्यसभेचे सदस्य आहेत.

तर अनुप्रिया पटेल यांच्या अपना दलने (सोनेलाल) दोन जागांवर निवडणूक लढवली होती, त्यापैकी अनुप्रिया पटेल यांना फक्त त्यांची जागा जिंकता आली. तर जीतन राम मांझी यांचा पक्ष हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) NDA कडून फक्त एक जागा मिळाली होती आणि त्यांनी स्वतः या जागेवरून (गया) निवडणूक लढवली आणि विजयी म्हणून संसदेत पोहोचले. तर जयंत चौधरी यांच्या पक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या आणि दोन्ही जागांवर त्यांचा पक्ष विजयी झाला होता. जयंत चौधरी हे स्वतः राज्यसभेचे खासदार आहेत.

हे खासदार टीडीपी कोट्यातून मंत्री होतील

तर टीडीपीने आपल्या कोट्यातील मंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. TDP नेते जयदेव गल्ला यांनी X वर पोस्ट केले की मोदी 3.0 मंत्रिमंडळात त्यांच्या पक्षाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री मिळाले आहे. तीन वेळा खासदार राहिलेले राम मोहन नायडू हे TDP कोट्यातून नव्याने स्थापन झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असतील आणि पी चंद्रशेखर पेम्मासानी हे राज्यमंत्री असतील.

शपथविधी सोहळ्यापूर्वी नरेंद्र मोदी 7 लोककल्याण मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी नवीन मंत्रिमंडळाच्या सदस्यांची भेट घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनात सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधानांचा शपथविधी सुरू असताना राजधानी दिल्ली आणि राष्ट्रपती भवनाभोवती सुरक्षेचे अभेद्य वलय असणार आहे.

नवी दिल्ली परिसर पुढील दोन दिवस नो फ्लाईंग झोन राहील. दिल्ली पोलिसांचे 3 हजार कर्मचारी, निमलष्करी दलाच्या 15 कंपन्या, NSG, SPG आणि इंटेलिजन्स विंगचे अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. संध्याकाळी 5 वाजल्यापासून पाहुणे राष्ट्रपती भवनात पोहोचण्यास सुरुवात करतील. 7:15 वाजता शपथविधीला सुरुवात होईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here