‘महाराष्ट्रात एक नेता आहे जो सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री…’ शरद पवार

0

मुंबई,दि.3: राष्ट्रवादी (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत टोला लगावला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. राज्यातील मतदान पाच टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 5 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे.

2019 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांचे राजकारण आता संपले अशी टीका फडणवीस यांनी केली होती. 2019 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील भारतीय जनता पार्टीची आणि शिवसेनेची युती मुख्यमंत्रीपदाच्या वादावरुन तुटली. त्यानंतर राज्यात शरद पवार यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सरकारचं मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंनी भुषवलं.

वर्ध्यातून अमर काळे आणि यवतमाळमधून संजय देशमुख या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरले त्यावेळेस शरद पवारांनी हजेरी लावली. याचवेळी शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी शरद पवारांचे राजकारण संपले आहे, असं बोललं जात आहे असा उल्लेख करत प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी सूचक पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत महाविकास आघाडी सरकारची घडी आपणच बसवली असल्याचा संदर्भ देत टोला लगावला.

जो सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री…

“महाराष्ट्रात एक नेता आहे. जो सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहे. 5 वर्षांपूर्वी प्रत्येक सभेत शरद पवार संपले असं ते म्हणत होते. मात्र निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अशी परिस्थिती होती की पुढले अडीच वर्ष शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी सरकार चालवले. त्यावेळी या नेत्याला विरोधी पक्षात बसावे लागले,” असं उत्तर शरद पवारांनी वर्ध्यातील पत्रकार परिषदेत दिलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here