‘मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, मी फक्त शरद पवार…’ संजय राऊत

0

मुंबई,दि.19: ‘मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, मी फक्त शरद पवारांचे ऐकतो.’ असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या टीकेला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अजित पवार यांनी 40 आमदारांचे सह्यांचे पत्र घेवून ठेवले आहे आणि ते पत्र भाजपाला पाठिंबा देत राज्यपालांना देणार असल्याची चर्चा सुरू होती. (Sanjay Raut On Ajit Pawar)

या सर्व चर्चेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले. त्यानंतर खुद्द अजित पवार यांनी या सगळ्या प्रकारावर स्पष्टीकरण दिले आणि कुठेही जाणार नसल्याचा खुलासा केला. यातच आता अजित पवार यांनी केलेल्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. काय चुकीचे लिहिले, माझ्यावर का खापर फोडता, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. 

संजय राऊत यांचे उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चालले, हे इतरांनी कुणी सांगू नये. तुम्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहात का, आम्ही कुणालाही वकीलपत्र दिलेले नाही. ज्याने त्याने आपल्या मुखपत्रातून आपल्या पक्षाविषयी लिहावे, असे रोखठोक भाष्य अजित पवार यांनी केले. याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर देताना, सामनाच्या अग्रलेखातून काहीही चुकीचे लिहिलेले नाही. विरोधकांना फोडण्याचे प्रयत्न सुरु नाहीत का? सत्य लिहिले आहे आणि सत्य बोलण्याची हिंमत ठेवतो. अजितदादांनी सांगावे, असे घडत नाही का, असा रोकडा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. 

शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होता | Sanjay Raut On Ajit Pawar

महाविकास आघाडीत आम्ही अजित पवारांवर प्रेम करतो. पण हा पक्ष फुटत असताना आम्ही चिंता व्यक्त करण्यात काहीही चुकीचे नाही. महाविकास आघाडीचा मी चौकीदार आहे. त्यामुळे बोललो. अजितदादा माझ्यावरच खापर का फोडतायत? शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होता. आपल्या बरोबरचा घटकपक्ष मजबूत रहावा, त्याचे लचके तुटले जाऊ नये, ही आमची भूमिका असेल, तरीही कुणी आमच्यावर खापर फोडत असेल तर गंमत आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.

कुणाच्या बापाला घाबरत नाही

दरम्यान, खरे बोलल्यामुळे मला कुणी टार्गेट केले आणि त्यामुळे मी मागे हटेन, असे वाटत असेल तर तसे नाही. मी नेहमीच खरे बोलतो. कुणाच्या बापाला घाबरत नाही. सामनात नेहमीच सत्य लिहिले जाते. त्यात लपवण्यासारखे काहीच नाही. पवार कुटुंबियांवर दबाव आहे. त्यासोबत राष्ट्रावादी काँग्रेसमधील हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल आदी नेत्यांवरही दबाव आहे. ज्या प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून भाजप ऑपरेशन करते. यावर आम्ही बोललो तर भाजपला राग यायला हवा. इतर कुणाला राग यायचे कारण नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here