“जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत आहे, तोपर्यंत रयतेच्या मराठ्यांचा…” प्रकाश आंबेडकर

0

मुंबई,दि.२६: वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काल मुंबईत संविधान सन्मान सभा पार पडली. या सभेत विविध मुद्द्यांवर भाष्य करत आंबेडकर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर निशाणा साधला. तसंच आरक्षण प्रश्नावरून टीका करणाऱ्या ओबीसी नेत्यांना इशारा दिला. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून त्यांना एक सल्लाही दिला आहे.

जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत आहे, तोपर्यंत…

मराठा आरक्षणाबाबत भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत आहे, तोपर्यंत रयतेच्या मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. जरांगे पाटील यांना सल्ला आहे की, सल्लागारांचं बिलकुल ऐकू नका. सोनिया गांधींनी जी चूक केली होती, ती करू नका,” असं आवाहन त्यांनी केलं. “जरांगे पाटील यांनी एवढंच तारतम्य बाळगावं, जी चूक सोनिया गांधी यांनी ‘मौत का सौदागर’ असे शब्द वापरुन केली, तशी चूक करू नये. जरांगे यांनीही आरक्षणाच्या या लढाईत आपण भेदभाव करतोय, वेगळेपणा आणतो, असं कृपा करुन आणू नये,” असंही आंबेडकर म्हणाले.

माझ्या नादी लागू नका

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांना अंगावर घेत प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या बाजूने रोखठोक भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांना ओबीसी नेत्यांच्या टीकेलाही सामोरं जावं लागत आहे. या टीकाकारांना उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ” आरक्षणाच्या मुद्द्यावर मी असं म्हटलो होतो की, ओबीसीचे ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठ्यांचे ताट वेगळं असले पाहिजे. आरक्षणावरून वाद सुरू झालेला आहे. ओबीसीचे जे सध्याचे नेते आहेत त्यांनी कृपा करून माझ्या नादी लागू नका. तुम्ही मंडलसोबत नव्हता तर कमंडलसोबत होता. जनता दलाबरोबर ओबीसी आरक्षण मिळवणारे आम्हीच होतो.”

या सभेत बोलताना आंबेडकर यांनी एक भीती व्यक्त केली आहे. “३ डिसेंबरनंतर देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात नरसंहार होण्याची शक्यता आहे. पण जनतेला माझं आवाहन आहे की, भडकाऊ संघटना खूप आहेत, त्यांना सांगा की, तुमचा मुलगा आधी पुढं करा मग आम्ही येतो,” असं ते म्हणाले. तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आजच्या सभेला येऊन गेले. त्यांना माझा आग्रह आहे की, वंचित बहुजन आघाडीने संविधानाची चर्चा सुरू केली. काँग्रेसने सुद्धा दुसऱ्या राज्यात संविधानाच्या सन्मानाची जनसभा घ्यावी, असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here