Nana Patole vs Ajit Pawar: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून नाना पटोले आणि अजित पवार यांच्यात वादाची ठिणगी

0

मुंबई,दि.13: Nana Patole vs Ajit Pawar: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून नाना पटोले आणि अजित पवार यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर एकीकडे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच दुसरीकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना विधानसभा अध्यक्षांनी राजीनामा द्यायलाच नको होता, पण त्यांनी तो दिला व मग सगळे घडले, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले. तर आपण विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची पूर्वकल्पना अजित पवार यांना दिली होती. याविषयी ते सपशेल खोटे बोलत आहेत, असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिले.

पक्षांतरबंदी कायद्याला काही अर्थ राहणार आहे की नाही

पुण्यातील बारामती होस्टेलसमोर पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांबरोबर संवाद साधला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर बोलताना त्यांनी यापुढे पक्षांतरबंदी कायद्याला काही अर्थ राहणार आहे की नाही माहिती नाही, अशा शब्दात खंत व्यक्त केली.

आमदारांच्या अपात्रतेसंबंधीचा निकाल विधानसभा

पवार म्हणाले, मी आधीच म्हटले होते की, आमदारांच्या अपात्रतेसंबंधीचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडेच जाईल. तसेच झाले आहे. देशात कुठेही असा पेचप्रसंग निर्माण झाला की आता याचा दाखला दिला जाईल. भाजपने सत्ता मिळताच पहिले काम केले ते म्हणजे विधानसभा अध्यक्षांचे रिक्त असलेले पद भरले, यावरून त्याचे महत्त्व लक्षात यावे. निकालात ताशेरे आहेत. पण, अटलबिहारी वाजपेयी यांची उंची व आताच्या लोकांची उंची मॅच होणार नाही. हे स्वप्नातदेखील राजीनामा देणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून वादाची ठिणगी | Nana Patole vs Ajit Pawar

आपण अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यासोबत अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांना सह्याद्री येथे भेटलो आणि मला काँग्रेस श्रेष्ठींच्या आदेशावरून राजीनामा द्यावा लागतो आहे, असे सांगितले. त्यावर आताच राजीनामा देण्याची घाई करू नका, असे ते म्हणाले होते. पण आपण त्यांना सांगून राजीनामा दिला होता. त्यामुळे राजीनामा दिल्याचे माहिती नव्हते, असे ते म्हणत असतील तर ते सपशेल खोटे बोलत आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदावर मी नसलो तरी उपाध्यक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. त्यांना आमदारांच्या अपात्रतेविषयी कारवाई करून अध्यक्षाचे अधिकार वापरता आले असते. ते त्यांनी वापरले नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here