Ghulam Nabi Azad On Rahul Gandhi | गुलाम नबी आझाद म्हणाले ‘राहुल गांधी परदेशात जाऊन…’

0

नवी दिल्ली,दि.10: Ghulam Nabi Azad On Rahul Gandhi: गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधींबाबत मोठा दावा केला आहे. आझाद म्हणाले ‘परदेशात जाऊन राहुल गांधी उद्योगपतीनां भेटतात.’ काँग्रेस आणि गांधी कुटुंबाशी असलेले अनेक वर्षांचे संबंध तोडून वेगळा पक्ष स्थापन करणाऱ्या गुलाम नबी आझादांनी (Ghulam Nabi Azad) आता राहुल गांधींवर जबरदस्त हल्ला चढवत मोठा दावा केला आहे. राहुल गांधी यांनी नुकतेच गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंधांवर प्रश्न उपस्थित करत, ट्विटच्या माध्यमाने अदानीच्या कंपनीत बेनामी 20 हजार कोटी रुपये कुणाचे, असा प्रश्न केला होता. यात त्यांनी काँग्रेस सोडलेल्या नेत्यांचा उल्लेख केला. ज्यात गुलाम नबी आझाद यांचेही नाव होते. राहुल यांच्या याच आरोपानंतर, आता गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या (राहुल गांधी) संदर्भात मोठा दावा केला आहे.

राहुल गांधी यांचेच अवांछित उद्योगपतींशी संबंध | Ghulam Nabi Azad On Rahul Gandhi

राहुल यांच्या आरोपानंतर, गुलाम नबी आझाद यांनी दावा केला आहे की, राहुल गांधी यांचेच अवांछित उद्योगपतींशी संबंध आहेत, ते आणि गांधी कुटुंब त्यांना भेटण्यासाठी परदेशातही जातात. आझाद यांच्या या दाव्यानंतर अथवा आरोपानंतर आता भारतीय जनता पक्षानेही राहुल गांधींना घेरले आहे. तसेच, राहुल गांधी ज्या उद्योगपतींना भेटले, त्यांची नावे त्यांनी जाहीर करावीत, असे भाजपने म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर, एका टीव्ही चॅनलसोबत बोलतांना आझाद म्हणाले, “राहुल गांधी यांचेही अवांछित उद्योगपतींसोबत (Undesirable Businessman) संबंध आहेत. एवढेचनही तर, राहुल यांच्यासह संपूर्ण गांधी कुटुंबीयांचेच अशा उद्योगपतींशी संबंध आहेत. मी याची 10 उदाहरणे देऊ शकतो, की जेथे परदेशात जाऊनही ते या उद्योगपतींनी भेटतात.” जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री आझाद यांचे गांधी कुटुंबासोबत तब्बल 50 वर्षांचे नाते होते. मात्र काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी ‘डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी’ची स्थापना केली.

राहुल गांधींचे ट्विट

राहुल गांधी यांनी गेल्या 8 एप्रिलला एका ट्विट करत, “सत्य लपवतात, म्हणूनच रोज भटकवतात!”, प्रश्न तोच आहे – अदानीच्या कंपन्यांमध्ये ₹20,000 कोटी बेनामी पैसा कुणाचा? असा सवाल केला होता. तसेच काँग्रेस सोडलेल्या गुलाम नबी आझादांसह काही भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांनाही अदानी वादात ओढले होते. 

आझाद यांच्या आरोपानंतर भाजपनेही राहुल यांना निशाण्यावर घेतले आहे. यासंदर्भात बोलताना भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी राहुल यांना सवाल केला आहे की, हे कोणते उद्योगपती आहेत ज्यांना आपण (राहुल गांधी) भेटता आणि आपली काय ‘विलिंग-डीलिंग’ आहे? हे जाणण्याची भाजपची इच्छा आहे. गुलाम नबी आझाद यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे की, राहुल गांधी जेव्हा-जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा-तेव्हा ते अनेक ‘अवांछित उद्योगपतींना’ भेटतात आणि अनेक उद्योगपती घराण्यांशी त्यांचे संबंध आहेत. 

त्यामुळे, आता देशाला जाणून घ्यायचे आहे की, राहुल गांधी परदेश दौऱ्यात कुणाला भेटतात? कोण आहेत हे ‘अवांछित व्यापारी’? त्यांचे हितसंबंध काय आहेत? राहुल गांधी भारत विरोधी व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यावर तर भारताला कमकुवत करण्यासाठी आणि मोदींच्या विरोधात काम करत नाहीत ना? असा सवालही रवीशंकर यांनी उपस्थित केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here