मग या घटनांत मृत्यूमुखी पडलेले सगळेच “शरदवासी” म्हणायचे का?: चंद्रशेखर बावनकुळे

0

मुंबई,दि.१: राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २६ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. यानंतर आता यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यावर खासदार शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, समृद्धी महामार्गावरील अपघात अतिशय दुर्दैवी घटना आहे. संपूर्ण महाराष्ट्र शोक करतो आहे. हा अपघात आहे. समृद्धी महामार्गाला सर्वोत्तम महामार्ग करण्यासाठी मा. देवेंद्रजींनी जीवाचे रान केले. लाखो प्रवासी या मार्गाचा उपयोग करत आहेत. असंख्य वाहने धावत आहेत. वेळेची बचत होत आहे.

देशातील अनेक महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या. अपघात कधीही घडू शकतो. असे सगळे सर्वांना माहीत असूनही, देवेंद्रजींचा व्यक्तिगत विरोध करताना खालची पातळी आज शरद पवार यांनी गाठली.

समृद्धी महामार्गावरील या अपघाताबद्दल मत मांडताना कळस गाठला. “आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की एखाद दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली की लोक असं म्हणतात की या अपघातात एक देवेंद्रवासी झाला.”

पवारसाहेब, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि तुमच्या पक्षाची सत्ता असताना सत्तेची मस्ती अंगात आणून घडलेली हत्याकांडे तुम्ही सोयीस्कर विसरले.

पवार गोवारी विसरले, पवार मावळचा गोळीबार विसरले, पवार मुंबईवरचा दहशतवादी हल्लाही विसरले हे सगळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात घडले, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.  

मग या घटनांत मृत्यूमुखी पडलेले सगळेच “शरदवासी” म्हणायचे का?

गोवारी हत्याकांड घडले तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. या हत्याकांडातील मरण पावलेल्या निष्पाप जीवांच्या कुटुंबीयांना न भेटता, जखमींची विचारपूस न करता पवार साहेब त्याच रात्री मुंबईला गुपचूप निघून गेले. इतके असंवेदशील मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते. मुंबई दहशतवादी हल्ल्यात कोण काय बोलले होते, तेही पवारांनी आठवले पाहिजे, असंही बावनकुळे म्हणाले. मावळचा गोळीबार झाला तेव्हा पवारांना जालीयनवाला हत्याकांड आठवले नाही.

पवारसाहेब, या सगळ्या घटनांनी महाराष्ट्राच्या मनावर कायमचे ओरखडे उमटले. डोळ्यात अश्रू आहेत. अजूनही जखमा ओल्या आहेत.
मग या घटनांत मृत्यूमुखी पडलेले सगळेच “शरदवासी” म्हणायचे का?


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here