खासदार सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

0

पुणे,दि.२३: खासदार सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधीपक्षाच्या जवळपास दीडशे खासदारांचं लोकसभा आणि राज्यसभेतून निलंबन करण्यात आलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं खासदारांचं निलंबन झाल्यामुळे देशभरातून यावर टीका केली जात आहे. निलंबन केलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे. सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांच प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले अजित पवार?

केवळ सुप्रिया सुळे यांचं एकट्याचंच निलंबन झालं नाही, अनेक खासदारांचं निलंबन झालं आहे. संसदेत नियमाचा भंग झाल्याने कारवाई केली आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. ते पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.

सुप्रिया सुळेंच्या निलंबनाबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, “फक्त सुप्रिया सुळेंचं निलंबन झालं नाही. अनेक खासदारांचं निलंबन झालं आहे. जेव्हा खासदार किंवा आमदार विधिमंडळांत, लोकसभेत आणि राज्यसभेत काम करत असतात. त्यावेळी कुठल्या तरी नियमाचा भंग झाल्यास त्याप्रमाणे कारवाई केली जाते. त्यानुसारच निलंबनाची कारवाई झालेली आपण पाहिली आहे.”

जवळपास दीडशे खासदारांचं निलंबन झाल्याबद्दल विचारलं असता अजित पवार पुढे म्हणाले, “तिथे काय घडलं? हे मला माहीत नाही. विधानसभेत काय घडलं? हे विचारलं असतं तर मी सांगितलं असतं. माझ्या माहितीप्रमाणे संसदेत उपराष्ट्रपतींचा अपमान करण्यात आला. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान किंवा कुठल्याही राज्याचे मुख्यमंत्री असतील, ही महत्त्वाची पदं आहेत. एवढ्या मोठ्या भारतात लोकशाही पद्धतीने निवडून गेलेले ते लोक असतात. ते आपापलं काम योग्य पद्धतीने करत असतात. कारण ज्यावेळी एवढा मोठा समाज त्यांच्या पाठिशी उभा राहतो आणि त्यांच्या विचारांच्या लोकांना निवडून देतो. याचा अर्थ त्यांनी कुठेतरी जनाधार मिळवलेला असतो. उपराष्ट्रपतीही अतिशय व्यवस्थितपणे आपलं स्वत:चं काम पार पाडत असतात. असं असताना तिथे जी काही घटना घडली, त्यामुळे त्यांच्यावर ती कारवाई झाली आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here