सोलापूर,दि.१६: pm kisaan: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेत जिल्ह्यातील शेतकरी कागदपत्रांच्या त्रुटीमुळे योजनेपासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांना योजनेच्या लाभासाठी कागदपत्रांच्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी दिनांक 25 मार्च 2022 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक गावात शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी या योजनेत जिल्ह्यातील 50 हजार 204 लाभार्थी कागदपत्राच्या त्रुटीमुळे योजनेपासून वंचित राहिले आहेत. शेतकऱ्यांच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी प्रत्येक गावात संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक शिबिरास उपस्थित राहणार असून संबंधित कर्मचारी कागदपत्रांच्या त्रुटीच्या पूर्ततेसाठी माहिती देऊन संबंधित शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करतील. तसेच जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा निधी मिळत नाही अशा शेतकऱ्यांची यादी संबंधित कर्मचाऱ्यांकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित शेतकऱ्यांनी सातबारा उतारा, बँकेचे पासबुक ,आधारकार्ड आदी कागदपत्रांची छायांकित प्रतीची पुर्तता करावी. शेतकऱ्यांची माहिती प्राप्त झाल्यानंतर आवश्यक दुरुस्ती करून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. तरी संबंधित शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे उपस्थित होते.
Home सोलापूर वार्ता pm kisaan: पीएम किसान योजना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी 25 मार्चला गावोगावी शिबीर








