शिवसेना भवन आणि पक्षनिधी शिंदे गटाला देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल

0

नवी दिल्ली,दि.१०: शिवसेना भवन आणि पक्षनिधी शिंदे गटाला देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेना मुख्यनेते बनले आहेत. त्यामुळे शिवसेना भवन आणि पक्षनिधी एकनाथ शिंदेंना देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

आशिष गिरी असे याचिका दाखल करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. तसेच, कोणत्याही गटाचा कार्यकर्ता नसल्याचे आशिष गिरी यांनी स्पष्ट केले आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध…

आशिष गिरी म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंना अध्यक्ष म्हणून कायम ठेवले, तर शिवसेना भवन, निधी आणि सर्व शाखा त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात याव्या. तसेच, निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा, अशी मागणी केली आहे.”

…दोन्ही याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात यावी

“निवडणूक आयोगाच्या निकालासंदर्भात उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता माझीही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात यावी,” अशी मागणीही गिरी यांनी केली.

एक वकील आणि मतदार असल्याने हस्तक्षेप याचिका

“मी कोणत्याही पक्षाशी संलग्न नसून, याचिकेचा शिंदे गटाशी संबंध नाही. एक वकील आणि मतदार असल्याने हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. मी कायद्याच्या बाजूने आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने दिला, तर सर्व त्यांना देण्यात यावे. एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला, तर त्यांना दिले जावे. मात्र, आता सर्व गोष्टींवर निर्बंध लागण्यात यावे,” असे गिरी म्हणाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here