छत्रपती संभाजीनगर,दि.24: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांबरोबरच मराठा नेत्यांवरही निशाणा साधला आहे. ओबीसी नेते मताचा विचार न करता आरक्षणाचा विचार करतायेत. परंतु मराठा नेते मतांचा विचार करत आहेत. आरक्षणाचा नाही हा फरक त्यांच्यात आणि आमच्यात आहे. असे मनोज जरांगे म्हणाले. आरक्षण हा विषय त्यांच्यासाठी मोठा आहे त्यामुळे मते आणि निवडून येणे त्यांच्यासाठी मोठे नाही. हीच भूमिका सगळ्या पक्षातील मराठा नेत्यांनी घेणं गरजेचे आहे असं आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.
मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आम्ही जी सत्य मागणी केली ती अनेकांना रुचलेली नाहीये. मी एकटा पडलोय, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. मराठ्यांचे नेते मतांचा विचार करतात आरक्षणाचा नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
मराठ्यांच्या जीवावर निवडून येणारे ओबीसी नेते…
‘आम्ही सत्य बोलतो, कायद्याने मराठ्यांना आरक्षण दिलं आहे. सरकारी नोंदी आहेत. मराठा हा कुणबी असल्याचा उल्लेख आहे.मी नेमकं महत्त्वाच्या विषयावर बोट ठेवल्याने सगळ्यांना पोटदुखी होऊ लागले. हा मुलगा जो पर्यंत या लढ्यात आहे तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळून देणार आहे. सत्यता बाहेर आली आहे. मराठ्यांच्या जीवावर निवडून येणारे ओबीसी नेते आता मराठा समाजासमोर उघडे पडले आहेत,’ असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
‘महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि मराठे नेत्यांना सांगतो सगळ्या पक्षातीले ओबीसी नेते मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ते एकटवले आहेत. ते मतांचा विचार नाही तर आरक्षणाचा विचार करायला लागले आहेत. त्याउलट मराठ्यांचे नेते आरक्षणाचा नाही तर मतांचा विचार करत आहेत. हा फरक आहे त्यांच्यात आणि मराठ्यांच्या नेत्यांमध्ये. आरक्षण विषय इतका मोठा आहे त्यांच्यासाठी की मतं आणि निवडून येणे महत्त्वाचं नाहीये त्यांच्यासाठी,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.








