ओबीसी नेता सोडता अन्य नेत्यांना गावात प्रवेश बंदी, या गावात लागला पहिला बॅनर

0

जालना,दि.24: महाराष्ट्रात ओबीसी-मराठा आरक्षणावरून वातावरण तणाग्रस्त होत चालले आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळायला पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण केले होते. मराठा समाजाने यापूर्वी आक्रमक भूमिका घेत नेत्यांना गावबंदी केली होती.

अनेक गावात मराठा समाजाने नेत्यांना गावबंदी केल्याचे बॅनर लावले होते. आता ओबीसी समाजाने बॅनर लावला आहे. गावागावात मराठा आणि ओबीसी असा सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन्हीही नेते मराठा आणि ओबीसी हे भाऊ-भाऊ असल्याचं सांगतात. मात्र, गावपातळीवर याची धग पोहोचल्याचं दिसून येत आहे. 

आरक्षण वादामुळे राज्यातील वातावरण दुषित होऊ लागले असून ओबीसी समाजाच्यावतीने जालन्यातील एका गावात गावबंदीचा पहिला बॅनर लावण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी राज्यभरात गावोगावी राजकीय नेत्यांना प्रवेशबंदीचे बॅनर लावण्यात आले होते. हे बंदी सर्वच नेत्यांना सरसकट घालण्यात आली होती. परंतू, ओबीसी समाजाने ओबीसी नेत्यांना परवानगी असल्याचे म्हणत इतर समाजाच्या नेत्यांना गावबंदी केली आहे. 

ओबीसी समाजाने ओबीसी नेता वगळून इतर समाजाच्या नेत्यांना गावबंदी केली आहे. परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावात हा बॅनर लागला आहे. ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यांनी गावात प्रवेश करू नये, तसे झाल्यास मोठा अवमान करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. हाके यांनी हा निर्णय चुकीचा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here