नितीन गडकरींनी उधळली शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने

0

अमरावती,दि.२७: भाजपा नेते केंद्रीयमंत्री नितीम गडकरी यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. भाजपाच्या अनेक नेत्यांकडून राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष खासदार शरद पवारांवर टीका केली जाते. राष्ट्रवादीत फूट पडली आहे. अजित पवार भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाले आहेत. मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात शरद पवारांवर जोरदार स्तुतीसुमने उधळली आहेत. “विविध क्षेत्रातील गुणवत्ताधारकांच्या पाठीशी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता उभं राहणारं महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे शरद पवार,” अशा शब्दांत नितीन गडकरी यांनी शरद पवारांबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

पक्षविरहीत मैत्रीसाठी नितीन गडकरी आणि शरद पवार हे ओळखले जातात. गडकरी आणि पवार आज डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एकत्र आले होते. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने १२५ रुपयाचे नाणे जारी केले. या नाण्याचे लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. तसंच यावेळी यूपीए सरकारमध्ये केंद्रीय कृषीमंत्री राहिलेल्या शरद पवार यांना शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शरद पवारांचं कौतुक

नितीन गडकरी यांनी पुरस्कार सोहळ्यावेळी शरद पवारांचं कौतुक करत या पुरस्कारासाठी पवार यांच्या उंचीची माणसं दरवर्षी कुठून मिळणार, असं म्हटलं आहे. “पंजाबराव देशमुख यांच्याकडे असणारी तळमळ आणि व्हिजन शरद पवार यांच्याकडेही आहे. राजकीय धुळवड सुरू असते. मात्र, या राजकीय धुळवडीत डॉ. पंजाबराव देशमुख आणि शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांचं नाव व कार्य सामान्यांच्या कायम लक्षात राहतं,” असं गडकरी म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here