Sanjay Raut | आधी बाप पळवायचे, आता मुलंही पळवतात: संजय राऊत

0

नवी दिल्ली,दि.14: दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) सरकारी कर्मचारी संपावर जात आहेत. शेतकरी लाँग मार्च घेऊन मुंबईत धडकत आहेत, याच अर्थ महाराष्ट्र खदखदतोय असं वक्तव्य शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. जनतेच्या मनातील सरकार आम्ही सत्तेवर आणलं असे म्हणत होते. पण जनतेच्या मनातील सरकार असते तर जनता रस्त्यावर उतरली नसती असा टोलाही राऊतांनी लगावला. हे सरकार शेतकरी, कष्टकऱ्यांच्या विरोधातील असल्याचे राऊत म्हणाले.

आधी बाप पळवायचे आता मुलंही पळवतात | Sanjay Raut

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. दरम्यान, यावरून विविध राजकीय चर्चा सुरू असताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. मिंधे गट आधी बाप पळवायचे, आता मुलंही पळवायला लागले, असे ते म्हणाले. दिल्लीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत काय म्हणाले?

“सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांचे चिरंजीव शिवसेनेत नव्हते. काल सुभाष देसाईंनी निवदेन जारी करत भूषण देसाई हे शिवसेनेचे सदस्य नव्हते, हे स्पष्ट केले आहे. पण मिंधे गट कधी बाप पळवतात. आता मुलंही पळवायला लागले आहेत. त्यांची ही मेगा भरती सुरू आहे, ती कुचकामी आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

उदय सामंत यांच्या आरोपांचं काय झालं?

“उदय सामंत यांनी काही महिन्यांपूर्वी भूषण देसाईंवर काही आरोप केले होते. त्यांच्या चौकशीचे आम्ही आदेश दिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, त्यांनी आता भूषण देसाई यांना भाजपाच्या वाशिंगमशीनमध्ये टाकून आपल्या बाजुला बसवले आहे. ही भाजपाच्या वाशिंगमशीनची कमाल आहे. मग उदय सामंत यांच्या आरोपांचं काय झालं?” असा प्रश्नही त्यांनी विचारला. तसेच भूषण देसाईंच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here