मुंबई,दि.25: शरद पवार आणि अजित पवारांबाबत राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपा नंतर शिवसेनेने (शिंदे गट) 57 जागांवर तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) 41 जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असून शिवसेनेने (ठाकरे गट) 20 जागांवर तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) 10 जागांवर व काँग्रेसने 16 जागांवर विजय मिळवला आहे.
राष्ट्रवादी (अजित पवार गट) नेते नरहरी झिरवाळ यांनी tv9 मराठीशी बोलताना मोठे वक्तव्य केले आहे. अजित पवार आणि शरद पवार कधीही एकत्र येऊ शकतात, असे विधान नरहरी झिरवाळ यांनी केले आहे. “मी दररोज मंत्रालयात जात असतो. त्यामुळे आता मलाही कोणतंही एखादं मंत्रीपद दिलं तरी चालेल, पण द्यावं ही विनंती. शरद पवार अजित पवार कधीही एकत्र येऊ शकतात. राजकारणात काहीही होऊ शकतं. राजकारणात कोण कोणाचा शत्रू मित्र या गोष्टी सुरुच असतात”, असेही नरहरी झिरवाळ यांनी म्हटले.