मुंबई,दि.14: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अजून संपण्याची चिन्हे नाहीत. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. शिवसेनेतील सत्ता संघर्ष व फूट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 12 ऑगस्टला अपेक्षित असलेली सुनावणी लांबणीवर गेली असून आता ती 22 होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप रविवारी जाहीर केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 10 पेक्षा अधिक खात्यांचा कार्यभार असणार आहे. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभागासह सात खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
महिला व बाल कल्याण विभागाचा कार्यभार आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे असणार आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल आणि उदय सामंत यांच्याकडे उद्योग खात्याचा कार्यभार असेल. यानंतर खातेवाटपावरून काँग्रेसने शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
“शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल” असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी खातेवाटपावरून निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहेत. “फडणवीसांनी अनेक महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली. शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल” असं पटोले यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच आणखी काही ट्विट करत भाजपावर देखील हल्लाबोल केला आहे.
नाना पटोले यांनी “भाजपा सत्तेचा अमरपट्टा घातल्याप्रमाणे वावरत आहे, परंतु याची आंबट फळेच त्यांच्या वाट्याला येतील. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायप्रक्रियेस होणारा विलंब ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे” असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे. खातेवाटपानंतर राष्ट्रवादीने शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.