भंडारा,दि.17: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटीमध्ये महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातील समाजातील नेत्यांना बोलवले आहे. मराठा समन्वयक, उपोषणकर्ते, साखळी उपोषणकर्ते, मराठा समाजातील वकील, डॉक्टर, प्राध्यापक आणि मराठा आरक्षण विषयातील तज्ज्ञ यावेळी उपस्थित राहणार आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे. त्याचवेळी काँग्रेस नेते नाना पटोले यांचे वक्तव्य समोर आले आहे. यामध्ये नाना पटोले यांनी मनोज जरांगे यांचा बाप काढला आहे. त्यामुळे पुन्हा आरोप-प्रत्यारोप होणार आहे.
नाना पटोले काय म्हणाले?
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले आपल्या मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी लाखांदूर तालुक्यातील मांडळ येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरली. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचा बाप काढला. नाना पटोले म्हणाले की, “ जरांगे पाटील म्हणतात मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. पण ज्यांचा बापचे मराठा प्रमाणपत्र असेल, आजोबाचे मराठा प्रमाणपत्र आहे, त्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र कशाला हवे..? असा सवाल करीत मनोज जरांगे पाटील यांना खडे बोल सुनावले. नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर नारायण राणे, छगन भुजबळनंतर आता नाना पटोले मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर येणार आहे.
प्रमाणपत्र घेताना आपल्या स्वत: जावे लागते. त्यावेळी आपली वंशावळी द्यावी लागते. आम्ही ओबीसी असून ओबीसीची कागदपत्रे नसतील तर आम्हाला प्रमाणपत्र मिळणार नाही. परंतु आता आरक्षणाच्या विषयामुळे महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी हे मुद्दे बाजूला गेले. शेतकऱ्यांचे प्रश्न मागे गेले. विधानसभेत आपण हे विषय मांडत असल्याचे नाना पटोले यांना सांगितले.
नाना पटोले यांचा विरोध
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उघड विरोध दर्शवला आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी विरोधी भूमिका घेतली. आता नाना पटोले देखील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या विरोध करताना दिसून येत आहे. यामुळे एकीकडे मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी आंदोलन करत असताना विविध राजकीय पक्षांकडून कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध केला जात आहे. राज्य सरकारने मराठा समाजास आरक्षण देण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजास आरक्षण देणार असल्याचे स्पष्ट केले. परंतु हे आरक्षण देताना इतर कोणाच्या आरक्षणास धक्का लागणार नसल्याचे त्यांनी सांगितले.