मुंबई,दि.२६: अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी २०२४ च्या लोकसभेत भाजपा किती जागा जिंकेल हे सांगितले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय वातावरण तापत आहे. त्यात या निवडणुकीत कोण विजयी होईल याबाबत विविध सर्व्हे पुढे येत आहेत. अशावेळी बॉलिवूडमधील दिग्गज मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी लोकसभा निवडणुकीवर भाकीत वर्तवले आहे. देशात भाजपाला पर्याय नाही, त्यामुळे पुढील निवडणुकीत भाजपाच जिंकेल असा दावा पाटेकर यांनी केला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नानांनी हे भाष्य केले आहे. सध्या सोशल मीडियावर नाना पाटेकर यांनी वर्तवलेल्या राजकीय भविष्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या निवडणुकीबाबत पत्रकाराने नानांना प्रश्न विचारला की, २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका आहेत. त्या निवडणुकीबाबत तुम्ही काय पाहता? त्यावर तू बघ, किती मोठ्या प्रमाणात भाजपा जिंकेल. आता ती कुठे जिंकेल, कसं जिंकेल हे पाहावं, भाजपाशिवाय दुसरा पर्याय नाही. इतके चांगले काम सुरू आहे. त्यामुळे ३५०-३७५ जागा भाजपा जिंकल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. मोदींमुळे आपल्या भारताची प्रतिमा जगभरात उंचावली त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे असं त्यांनी म्हटलं. झी हिंदी वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत त्यांनी हा दावा केला.
नाना मोदीभक्त झालेत का?
मी नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. मध्यंतरी काहीजण मला तुम्ही मोदीभक्त झालात असं बोलत होते. अरे, त्यांनी काम चांगले केले तर चांगलेच बोलावे लागेल.मग तुम्ही मोदीभक्त म्हणाल तरी चालेल. मी कुठल्याही पक्षाचा नाही.जे चांगले आहे त्याला चांगले बोलणं आपण कधी सुरू करणार? जर तुम्हाला सर्वच वाईट दिसत असेल तर ते तुमच्यावर निर्भर आहे. मला जे योग्य वाटते ते मी करतो असं नाना पाटेकर यांनी सांगितले.
मला माझ्या गुंतवणुकीबाबत काहीच माहिती नाही.मला नाटक, सिनेमा हेच माहिती आहे. गुंतवणूक वैगेरे याबाबत मला माहिती नाही, सीए आणि माझ्यासोबतच्यांना माहिती आहे असं नानांनी पत्रकाराला सांगितले.