पोलिसांवर खुनी हल्ला प्रकरण, १२ जणांची निर्दोष मुक्तता

0

सोलापूर,दि.२३: पोलिसांवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयाने १२ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करून खुनी हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी रघुनाथ घोडके, पप्पू टोणपे, संभाजी घोडके, तानाजी कदम, मुन्ना शिंदे, सुनील अंबरे, विठ्ठल धोटे, रामचंद्र हराळे, सोमनाथ कानडे, अर्जुन जाधव, पैगंबर मुजावर, दत्तात्रय चौगुले सर्व रा. कुरुल, ता. मोहोळ, जि. सोलापूर यांची जिल्हा व सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांनी निर्दोष मुक्तता केली.

यात हकीकत अशी कि दि ०८/०८/२०१५ रोजी कातेवाडी ता. मोहोळ येथील पोलीस पाटील अशोक क्षीरसागर यांनी पोलीस ठाण्याच्या फोनवर फोन करून कळविले की कातेवाडी येथे एका जीप गाडी मध्ये ६ लोक आलेले होते ते चोर म्हणून पकडले आहेत. पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पाठवून द्या असा फोन आला असलेबाबत पोलीस ठाणे अंमलदार यांनी फिर्यादी पोलीस यांना सांगितले.

त्याप्रमाणे फिर्यादी व इतर पोलीस कर्मचारी खाजगी वाहनाने कातेवाडी गावात गेले त्यावेळी त्या ६ संशयित चोरांना ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये ठेवलेले होते. त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाचे आजूबाजूला सुमारे २५०-३०० लोक जमा झालेले होते व सदरचा जमाव हा प्रक्षुब्ध झालेला होता. फिर्यादी हे त्यांच्या पोलीस दस्ताला घेऊन ग्रामपंचायत ऑफिस जवळ गेले असता तेथे जमावातील लोक हे सदर चोरट्यांना आमचे ताब्यात द्या आम्ही त्यांचे बघतो असे म्हणत होते.

पोलिसांवर खुनी हल्ला प्रकरण

त्या ६ लोकांना ताब्यात घेत असताना अचानक गावातील २०-२५ लोकांनी फिर्यादी पोलीस व इतर कर्मचारी यांच्यावर अचानक दगडांचा वर्षाव केला व त्यात ४ पोलीस कर्मचारी जबर जखमी झाले. तसेच दगडफेक करून सरकारी जीपचे नुकसान केले. त्याप्रमाणे यातील आरोपींविरुद्ध कामती पोलीस स्टेशन येथे फिर्यादीने गुन्हा दाखल केला होता. सदर कामी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

सदर खटल्याच्या सुनावणीवेळी सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी महत्वाचे साक्षीदार म्हणजे फिर्यादी तसेच जखमी पोलीस कर्मचारी व सदर केसचे तपासाधिकारी हे होते. तसेच फिर्यादी व तपास अधिकारी यांची आरोपीचे वकिल अॅड. अभिजित इटकर यांनी घेतलेली उलटतपासणी खटल्यास कलाटणी देणारी ठरली.

सदर खटल्याच्या सुनावणी दरम्यान महत्वाच्या साक्षीदाराच्या उलटतपासणीमध्ये अनेक बाबींचा खुलासा झाला. त्यापैकी काही म्हणजे घटनेच्या दिवशी सदर फिर्यादीने घटना स्थळावर जाण्यापूर्वी सोलापूर शहरातून दंगल विरोधी पथकास पाचारण केलेले होते व त्याची स्पष्ट नोंद त्यादिवशीच्या स्टेशन डायरी मध्ये करण्यात आलेली होती. तसेच सदर फिर्यादी हे दंगल विरोधी पथकासोबतच घटनास्थळावर गेल्याची बाब फिर्यादीने मान्य केली.

त्यामुळे घटना स्थळावर जमलेल्या लोकांवरती सदर दंगल विरोधी पथकाने कारण नसताना लाठी चार्ज केला व त्या घटनेमध्ये अनेक ग्रामस्थ जखमी झाले व सदरचा लाठीचार्ज हा गरज नसताना केलेला होता व तो अंगलट येऊ नये म्हणून सदरची खोटी फिर्याद दाखल केल्याची शक्यता नाकारता येत नाही असा युक्तिवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला. सदर खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपी पक्षातर्फे अनेक सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचा आधार घेण्यात आला.

सदर बाबींचा विचार करून जिल्हा व सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांनी सदर आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीतर्फे अॅड. अभिजित इटकर, अॅड. राम शिंदे, अॅड. संतोष आवळे, अॅड. फैयाज शेख, अॅड. सुमित लवटे, अँड. शिवाजी कांबळे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here