परभणीत मनसे शहराध्यक्ष सचिन पाटील यांची हत्या

0

परभणी,दि.६: परभणीमध्ये मनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील (Sachin Patil) यांची हत्या करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून शहरात खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. 

सचिन पाटील आपल्या सहकाऱ्यांसह कार्यालयात बसलेले असताना त्यांचा काही जणांशी किरकोळ वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं आणि एका पदाधिकाऱ्यानं सचिन पाटील यांच्या मानेवर चाकूनं वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. सचिन पाटील यांना सहकऱ्यांनी तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. पण रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्यानं अखेर त्यांचा मृत्यू झाला. एका उमद्या नेतृत्व गमावल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुनही सचिन पाटील यांच्या हत्येची माहिती देण्यात आली आहे. तसंच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. नवा मोंढा पोलीस ठाण्यात मनसे शहर प्रमुख सचिन पाटील यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येचा छडा लावण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे. अद्याप या हत्येप्रकरणी कुणालाही ताब्यात घेतल्याची किंवा अटक करण्यात आल्याची माहिती नाही. महत्वाची बाब म्हणजे सचिन पाटील यांनी कालच गंगाखेड येथे मनसेच्या एका शाखेचं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर रात्री हा संपूर्ण प्रकार घडला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here