मुंबई,दि.23: महाराष्ट्र बंदबाबत मुंबई हायकोर्टाने मोठा आदेश दिला आहे. बदलापूर येथील शाळेतील मुलींवर झालेल्या अत्त्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
मुंबई हायकोर्टात महाराष्ट्र बंदच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने या प्रकरणात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कोर्टाचे हे आदेश महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का देणारे आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर आता महाविकास आघाडीचे नेते काय निर्णय घेतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. tv9 मराठीने याबाबत वृत्त दिले आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने सरकारला दिले आहेत. महाधिवक्ता देवेंद्रकुमार ऊपाध्याय आणि अमित बोरकर यांच्या खंडपीठाचे हे आदेश दिले आहेत. कोर्टाचा हा आदेश महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा आहे. तरीही महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं तर राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र बंदची हाक
उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या नेत्यांनी राज्यातील जनतेला उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत हा बंद विकृती विरुद्ध संस्कृती, यासाठी आहे. हा बंद राजकारणासाठी नाही, असं म्हटलं आहे.
जनतेचा बंद
उद्धव ठाकरे यांनी आवाहन करताना म्हटलं आहे की, “हा बंद महाराष्ट्राच्या जनेतसाठी आहे. हा बंद महाविकास आघाडीचा बंद नाही तर सर्व जनतेचा बंद आहे. सर्वांनी या बंदात सहभागी व्हा तसेच उद्याचा बंद कडकडीत असावा. बंद काळात ज्या अत्यावश्यक सेवा आहे त्या चालू राहतील. दुपारी 2 वाजेपर्यंत हा बंद पाळावा. दुकानदारांनाही उद्या बंद पाळावा,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.