“ही मॅच फिक्सिंग आहे का? मनोज जरांगे पाटलांच्या सभेची सुरुवात करणारे…” नितेश राणे

0

नागपूर,दि.१३: मराठा आरक्षणासाठी एकाबाजूला गावबंदी केली जाते तर दुसऱ्या बाजूला संघर्ष यात्रा काढली जाते, ही मॅच फिक्सिंग आहे का? मनोज जरांगे पाटलांच्या सभेची सुरुवात करणारे छत्रपती संभाजीनगरचे प्रदीप साळुंखे जे आहेत. तो तिथे कसा दिसतो? मग त्याचे फोटो एका पक्षाच्या विशिष्ट नेत्यांसोबत कसे दिसतात. अलीकडेच ज्याला अटक केले त्याचे फोटो एका ज्येष्ठ नेत्यासोबत कसे दिसले? याची उत्तरे आम्हाला मिळाली पाहिजे. कारण जो माणूस आरक्षणासाठी लढला, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्याच्या नावाने टीका होत असेल तर आम्हाला स्पष्टीकरण मिळालेच पाहिजे अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणेंनी विधानसभेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर शंका उपस्थित केली.

नितेश राणे म्हणाले की, आमच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेत मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिलंय, ज्वलंत मराठा छत्रपती शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेणार नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मराठ्यांना आरक्षण मिळणारच हे नक्कीच आहे. परंतु आरक्षणानिमित्त जे आंदोलन उभे राहतंय त्यावर संशय यायला लागला आहे. जालनात आमचा जो भाऊ लढतोय त्याच्यावर फार प्रेम येतंय. परंतु ज्यावेळी कोपर्डी घटनेत आरोपींवर हल्ला केला तेव्हा त्याला वाचवायला कुणीही आले नव्हते. आमच्यासारखे लोक त्यांच्या पाठिशी उभे राहिले आणि त्यातून या सगळ्यांना बाहेर काढले. विरोधकांचे हे पाप आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे ही त्यांची मानसिकता नाही.

मविआ सरकारमध्ये वसुली प्रामाणिकपणे केली जायची म्हणून आज विरोधात बसण्याची वेळ आलीय. मविआ सरकारने प्रामाणिक प्रयत्न झाले असते तर राज्यात हिंसाचार झाला नसता, ज्या तरुणांनी आत्महत्या केली त्यांच्यावर ती वेळ आलीच नसती. या लोकांचे जीव गेले त्याला जबाबदार महाविकास आघाडी आहे. एक व्यक्ती उपोषणाला बसतो, सगळे त्याला समर्थन करतायेत. पण आजूबाजूला जी हिंसा घडतेय त्यावरून फक्त देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केले जातेय. मग यामागे नेमके कोण याचाही शोध घेतला पाहिजे. तो स्वत:हून बोलतोय का त्याच्या हातात कुणी स्क्रिप्ट दिलेली आहे. दुसऱ्या कुठल्याच नेत्यावर टीका होत नाही. पक्षावर टीका होत नाही. केवळ एका माणसाला टार्गेट केले जातेय. सगळ्यांवरच टीका करायला हवी असं त्यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन करायचा प्रयत्न

तसेच मराठा आरक्षणावर चर्चा का करावी लागतेय, मराठा आरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा सर्वजण एकमुखी पाठिंबा देतात. मग मराठा आरक्षणानिमित्ताने फक्त विशिष्ट लोकांनाच टार्गेट का केले जातेय?.मराठा आरक्षण आपल्या राज्यात लागू होते. १६ टक्के आरक्षण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिले होते. ते हायकोर्टात टिकवूनही दाखवले. परंतु ते सुप्रीम कोर्टात आरक्षण रद्द कसे झाले? उठसूठ देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर टीका होतेय. ज्यांनी आरक्षण दिले आणि ते टिकवले त्यांनाच आज व्हिलन करायला बघतोय असा आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केला. 

दरम्यान, विधानसभेत मराठा आरक्षणावर चर्चा सुरू होती. त्यावेळी नितेश राणे म्हणाले की, आरक्षण ज्यांनी घालवले, रद्द झाले त्यांच्याबद्दल कुणी बोलायला तयार नाही. आरक्षणाचे खरे मारेकरी कोण हे या चर्चेनिमित्त पुढे आले पाहिजे. १६ टक्के आरक्षण मराठ्यांना होते, हायकोर्टात विविध मुद्दे, तज्ज्ञांशी चर्चा करून टिकवले. देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नाने ते आरक्षण हायकोर्टात टिकले. परंतु नंतरच्या सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले का? ज्या सरकारच्या प्रमुखाच्या मुखपत्राने मराठा समाजाच्या ५८ मोर्चाला मूका मोर्चा म्हणून हिणवले. त्यांच्या नेतृत्वातील सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार आहे का? याचा विचार करायला हवा.

आरक्षणाचे खरे मारेकरी कोण हे त्यामुळे विचारायलाच नको. २०१९ मध्ये जे सरकार आले त्यांनी प्रामाणिकपणे मराठ्यांना आरक्षण देण्याचे प्रयत्न केले नाही. त्याचसोबत अगोदरच्या सरकारने जे वकील दिले तेच मविआ सरकारने दिले हे खरे नाही, खोटे आहे.३ वकील होते, त्यात तुषार मेहता, आत्माराम नाडकर्णी आणि निशिकांत कातेश्वर होते. या तिघांनाही उभे राहायला दिले नाही. १६०० पानांचे परिशिष्ठ तयार केले, गायकवाड समितीने त्रुटीचा अभ्यास केला त्यानंतर अहवाल दिला. मविआ सरकारने या १६०० पानांचे भाषांतरच केले नाही. ते कोर्टात सादर केले नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचे मारेकरी मविआ सरकारच आहे. जेव्हा जेव्हा तारीख होती तेव्हा वकिलांची तयारीच नव्हती. सुप्रीम कोर्टाने तेव्हाच्या सरकारवर ताशेरे ओढले होते. आता एकतर्फी टीका केली जातेय असंही नितेश राणेंनी म्हटलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here