मुंबई,दि.14: आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे. दोन्ही गटाचे आमदार विधानभवनात उपस्थित आहेत. राज्यातील सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सुरु होऊन काही महिने उलटले आहेत. आता पहिल्या अंकावरील सुनावणीला विधानसभा अध्यक्षांनी आजपासून सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोघांचीही बाजू मांडण्यासाठी वकिलांची फौज विधानसभेत दाखल झाली आहे. यावर आता दोन्ही बाजुच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी सुरू
महाराष्ट्रात सर्वांना या निर्णयाची उत्सुकता आहे तर अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार सुनिल प्रभू यांनी केली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 40 आमदारांची आणि शिवसेना ठाकरे गटाच्या 14 आमदारांची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर पार पडणार आहे. शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी दुपारी बारा वाजता सुरू झाली आहे. त्यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाचे आमदार विधीमंडळात दाखल झाले.
शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सोळा आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी राज्य विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. एकाच दिवशी सर्व 54 आमदारांची सुनावणी होईल. या सुनावणीसाठी शिवसेनेतल्या शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना हजर राहावं लागणार आहे. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांसमोर तब्बल 34 याचिकांवर सुनावणी होईल. या सुनावणीत वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करून आपलं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येईल. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी होणार असून, संबंधित आमदारांना त्या-त्यावेळी बोलावण्यात येणार आहे.
आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर पार पडणार आहे. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये अपात्रता प्रकरणाची सुनावणी पार पडणार आहे. सुनावणी पार पडत सर्व आमदारांना मोबाईल बाहेर ठेवण्याच्या सूचना देण्यात आली आहे. तसेच, सेंट्रल हाॅलमध्ये सर्वांना मागील बाकावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचिकेप्रमाणे त्या-त्या आमदारांना आणि त्यांच्या वकिलांनी पुढे बोलावून त्यांचं म्हणनं मांडण्याची संधी दिली जाणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या ज्या-ज्या आमदारांना नोटीस धाडण्यात आलेली ते सर्व आमदार सुनावणीसाठी उपस्थित आहेत. तसेच, विधानसभा अध्यक्षांनी आजच निर्णय द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
विधानभवनात काय घडलं?
विधानभवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर या प्रकरणांची सुनावणी केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार ही सुनावणी केली जात आहे. यावर आज झालेल्या सुनावणीत दोन्ही गटांना एकमेकांना याचिकेशी संबंधित कागदपत्र सोपवण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आल्याचं शिंदे गटाचे वकील अनिल सिंह यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
“आज सुनावणीची पहिली तारीख होती. सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या पहिल्या याचिकेवर सुनावणी चालू झाली. व्हीप न पाळल्यामुळे अपात्रतेची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. आमच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला की सुनील प्रभूंनी दाखल केलेल्या याचिकेच्या प्रती आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात. प्रभूंनी याचिका केली होती की सगळ्या प्रकरणांची सुनावणी एकत्र घेतली जावी. अध्यक्षांनी दोन्ही पक्षांना आदेश दिले आहेत की त्यांनी त्यांचे कागदपत्र एकमेकांना द्यावेत. यानंतर पुढची तारीख दिली जाईल. तेव्हा ठरेल की नेमकी सुनावणी कशा पद्धतीने होईल. कागदपत्र सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे”, असं अनिल सिंग यांनी यावेळी सांगितलं.
इतर प्रकरणांचं काय?
दरम्यान, या पहिल्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांना दोन आठवड्यांची मुदत दिली असली, तरी इतर याचिकांवर अजूनही विधानभवनात सुनावणी चालू असल्याची माहिती अनिल सिंग यांनी पत्रकारांना दिली आहे. दरम्यान, एकीकडे राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी चालू असली, तरी दोन्ही गटांकडून आपल्याच बाजूने निर्णय होईल असा दावा केला जात आहे.