मुंबई,दि.४: प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात शिवसेना फूटली आणि एकनाथ शिंदे शिवसेनेतील ४० आमदारांना घेऊन भाजपाबरोबर सत्तेत बसले. त्यावेळी शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडूदेखील एकनाथ शिंदे यांच्याबरोबर भाजपाला जाऊन मिळाले. परंतु, त्यांना शिंदे गट किंवा भाजपाने मंत्रिपद दिलं नाही. तसेच अलिकडच्या काळात बच्चू कडू आणि भाजपात संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. बच्चू कडू आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त करत आहेत. दरम्यान, भाजपाकडून मला त्रास होतोय, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. तसेच आपल्याबरोबर असलेल्या लोकांसाठी फिल्डिंग लावण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत असंही बच्चू कडू म्हणाले.
प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी काही वेळापूर्वी अकोला येथे प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, मला भाजपाचा खूप त्रास आहे. आम्हाला काँग्रेसचा आणि इतर पक्षांचा जितका त्रास होत नाही तितका त्रास भाजपाचा आहे. माझ्या मतदारसंघात भाजपाचा सगळ्यात जास्त त्रास होतोय. परंतु, आम्ही त्यांना जुमानत नाही. दोन खासदार, तीन आमदार आणि अजून ताकद लावा. परंतु, माझं म्हणणं आहे की मैत्री करताना, मित्रत्व निभावताना सगळ्याच अनुषंगाने निभावलं पाहिजे.
बच्चू कडू म्हणाले, मैत्री न निभावता फक्त कामापुरतं वापरायचं आणि नंतर दुर्लक्ष करायचं. हे चुकीचं आहे आणि भाजपाकडून असं होऊ नये. भाजपावाल्यांनी वरून खालपर्यंत व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे. परंतु, मला वाटतं त्यांनी केवळ सत्तेपुरता विचार न करता, सत्तेपलिकडे काही गोष्टी असतात, त्या स्वीकारल्या पाहिजेत. तसेच आपल्याबरोबर असलेल्या लोकांसाठीच फिल्डिंग लावायची हे उद्योग बंद केले पाहिजेत.
बच्चू कडू हे अमरावतीतल्या अचलपूरचे आमदार आहेत. तसेच अमरावतीतल्या मेळघाट विधानसभेतही बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पार्टिचा आमदार आहे. आगामी काळात बच्चू कडू यांचा पक्ष अमरावतीतून लोकसभा लढेल असं वक्तव्य बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. तेव्हापासून भाजपा आणि प्रजपामध्ये संघर्ष सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. निवडून आल्यानंतर त्या भाजपाच्या गोटात सामील झाल्या आहेत. त्यांचे पती रवी राणादेखील भाजपाच्या गोटात सामील झाले आहेत. आगामी निवडणुकीसाठी भाजपा सध्या राणा दाम्पत्याला बळ देत आहे. राणा दाम्पत्याला बळ देत असताना अमरावतीत प्रहार जनशक्ती पार्टीचं खच्चीकरण होत असल्याची चर्चा आहे.