स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर

0

मुंबई,दि.4: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबतची (OBC Reservation) सुनावणी 28 नोव्हेंबरला होणार आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यातील निवडणुका (Maharashtra Elections) पुन्हा एकदा लांबणीवर गेल्या आहेत. गेल्या दीड वर्षात या प्रकरणी एकदाही सुनावणी झालेली नाही. त्यामुळे आता 28 नोव्हेंबरला तरी सुनावणी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सोलापूर, मुंबई, पुण्यासह अनेक महानगरपालिका जिल्हा परिषदा, इतर स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्या निवडणुकांचं भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या या सुनावणीवर अवलंबून आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या सुनावणीसाठी यापूर्वी 20 सप्टेंबरची तारीख देण्यात आली होती. पण त्यादिवशीही कामकाज झालेलं नाही, त्यामुळे या सुनावणीसाठी जी पुढची तारीख देण्यात आली आहे, ती तब्बल दोन महिन्यांनी लांबणीवर पडलेली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जी पुढची तारीख देण्यात आली आहे. ती थेट 28 नोव्हेंबरला म्हणजेच, दिवाळीनंतर ही तारीख देण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचं शेवटचं कामकाज हे 2022 मध्ये झालेलं होतं. सुरुवातीला ओबीसी राजकीय आरक्षणाचा जो मुद्दा होता, त्यामुळे या निवडणुका लांबलेल्या होत्या. पण गेल्या जवळपास सव्वा वर्षापासून कोणत्याही कारणाविना या निवडणुकांची याचिका सर्वोच्च न्यायालयात लांबणीवर पडली आहे. त्यामुळे सहाजिकच मुंबई, पुण्यासह ज्या महापालिकांच्या निवडणुका यावर्षीही होण्याची शक्यता तशी कमीच दिसतेय. कारण 28 नोव्हेंबरला सुनावणी असेल, तर त्यानंतर निवडणुका घेण्यासाठी 2024 हेच वर्ष उजाडणार असं दिसतंय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here