मुंबई,दि.7: मिचौंग’ चक्रीवादळानं थैमान घातल्यानंतर आता देशातून हे वादळ मागे हटताना दिसत आहे. देशातील दाक्षिणात्य राज्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या या वादळाची तीव्रता कमी झाली असली तरीही त्यानंतर दिसणाऱ्या परिणामांच्या रुपात सध्या राज्यात अवकाळीची हजेरी पाहायला मिळत आहे. सध्या राज्याच्या विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राला अवकाळीनं झोडपणं सुरु ठेवलेलं असताना मराठवाडाही या तडाख्यातून बचावला नाही. पण, पुढील 24 तासांमध्ये मात्र या अवकाळीचंही प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
चक्रीवादळामुळं राज्यातील बहुतांश भागांवर पावसाळी ढगांचं सावट पाहायला मिळालं होतं. तर, काही भागांमध्ये पावसाची रिमझिमही सुरु होती. त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींची जोड असल्यामुळं राज्याच्या किमान तापमानात काही अंशांची घट नोंदवण्यात आली. दरम्यान, येत्या काळात विदर्भ वगळता सध्या राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
चक्रीवादळामुळं राज्याच्या गोंदिया, भंडारा भागांध्ये पावसानं हजेरी लावली तर, काही भागांमध्ये धुक्याची चादर पाहायला मिळाली. पश्चिम महाराष्ट्रातही पुढील 24 तासांमध्ये सूर्यदर्शन क्वचितच होणार असून, किमान तापमानात काही अंशांची घट नोंदवली जाण्याची शक्यता आहे.