धाराशिव,दि.21: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाकडून ‘बंद’ची हाक देण्यात आली आहे. राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असुन जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे तरीही शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने आज धाराशिव जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.
मंत्री शंभुराज देसाई आणि मराठा कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर मनोज जरांगेंनी काल रात्री सलाईन घेतली. त्यांच्या या आंदोलनाला मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. बीड, धाराशिव, पुण्यात बंदची हाक देण्यात आली आहे.
शासनाच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात येणार असुन सर्वांनी शांततेत बंद पाळावा अस आवाहन शनिवारी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल होते. त्यामुळे सकाळपासून धाराशिव शहरात शुकशुकाट पाहायला मिळत असुन बहुतांश भागात दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.दुपार नंतर मराठा बांधव आंतरवली सराटीकडे जाणार आहेत अस देखील मराठा बांधवांनी सांगितले.
बीड जिल्हा बंद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क असून जिल्ह्यातील 500 पेक्षा जास्त समन्वयकांना पोलिसांची नोटीस मराठा समन्वयकांना बीड पोलिसांची नोटीस देण्यात आली आहे. प्रशासनाने पाठवलेल्या नोटिसाना आम्ही भिक घालत नाहीत,पोलिसांकडून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मराठा समन्वयकांनी केला आहे. तसंच, मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीदेखील करण्यात येत आहे.